POKवर हिंदुस्थान ताबा मिळवेल काय, यावर काय म्हणाले संरक्षणमंत्री…वाचा सविस्तर…

3209

पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे, त्यावर पाकिस्तानने अवैधपणे कब्जा केला आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यात पाकव्याप्त कश्मीरवर हिंदुस्थानचा ताबा असेल अशी शक्यता वर्तवताना भविष्यात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले. पाकव्याप कश्मीर हिंदुस्थानचाच आहे, असे सिंह यांनी ठणकावून सांगत हिंदुस्थानच्या अंतर्गत बाबीत पाकिस्तानने हस्तक्षेप करू नये, असेही त्यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर नकाशात पाकव्याप्त कश्मीरचा समावेश करण्यात आला आहे. तसेच हवामान खात्यातर्फे जारी होणाऱ्या हवामानाच्या अंदाजात आता पाकव्याप्त कश्मीरचाही समावेश करण्यात येतो. पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असून तो लवकरच हिंदुस्थानात असेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सांगितले होते. त्यामुळे पाकव्याप्त कश्मीरवर हिंदुस्थान ताबा मिळवणार का, असे विचारल्यावर भविष्यात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

हिंदुस्थानचा विरोध करण्यावरच पाकिस्तानचे अस्तित्व अबलंबून असल्याचे सिंह यांनी सांगितले. त्यामुळे अस्तित्व टिकवण्यासाठी पाकिस्तान हिंदुस्थानच्या कुरापती काढत असल्याचे ते म्हणाले. सीमाभागात पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांना लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तसेच घुसखोरी रोखण्यातही जवानांना यश येत असल्याचे ते म्हणाले. सर्जिक स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करण्याची वेळ पाकिस्तानमुळेच आल्याचे ते म्हणाले. हिंदुस्थानातील अल्पसंख्याकांना प्रामुख्याने मुस्लीम समुदायाला चिथावण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहेत. हिंदुस्थानातील मुस्लीम समुदाय आमच्या परिवारातील सदस्य आहेत. ते हिंदुस्थानी आहेत. ते पाकिस्तानचे मनसुबे सफल होऊ देणार नाही, असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या