
हिंदुस्थानवर वक्रदृष्टी टाकणाऱ्या देशाच्या दुश्मनांना लष्कराच्या मदतीने मुँहतोड उत्तर देणार, ते माझे कर्तव्यच आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडाडले. मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली, त्यांची कर्तव्याप्रतीची दृढता हिंदुस्थानी जनतेला माहीत आहे. आयुष्यात जोखीम उचलणे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगल्याच प्रकारे शिकले आहेत. तेदेखील सर्वांनाच माहीत आहे. तुम्हाला जसे हवे आहे तसेच होणार असे आश्वासन मी तुम्हाला देतो असेही राजनाथ सिंह म्हणाले. माझ्या जवानांसोबत मिळून देशाच्या सीमांचे रक्षण करणे आणि देशाच्या दुश्मनांना चोख प्रत्युत्तर देणे हे माझे कर्तव्य आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या दुश्मनांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतील, त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला जे हवे तेच होणार. जगातील कोणतीही शक्ति हिंदुस्थानला संपवू शकत नाही, असेही संरक्षण मंत्री म्हणाले.
शब्द नको, कृती करा -काँग्रेस
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 15 दिवस उलटूनही सरकारने कुठलीही अॅक्शन घेतलेली नाही. पाकिस्तानला धडा शिकवा. केवळ शब्द नको, कृती करा, अशा शब्दांत काँग्रेसने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल संविधान बचाव रॅलीत बोलत होते. इतके दिवस उलटूनही सरकार पाकिस्तानविरोधात कोणतीही ठोस कारवाई का करत नाही? असा सवालही त्यांनी केला.