आदिवासी मुले व महिलांसाठी दूध भुकटी मोफत देणार!

343

दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील 6 लाख 51  हजार मुलांना आणि 1 लाख 21  हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव  ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, त्याचप्रमाणे राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, दुग्धविकास प्रधान सचिव अनुप कुमार, महिला व बालकल्याण सचिव आय. ए. कुंदन, आदिवासी  विकास सचिव विनिता सिंघल व महानंदचे प्रतिनिधीही उपस्थित होते. ही योजना पुढे एक वर्ष राबविण्यात येणार असून 121  कोटी रुपये उत्पादन खर्च आला आहे. भुकटीचा प्रती किलो उत्पादन खर्च 246 रुपये 70 पैसे इतका आहे.

दुध भुकटीत प्रोटीनचे प्रमाण 34 टक्के आहे आणि या कोविड काळात पोषणासाठी ती उपयुक्त असल्याने  स्तनदा व गरोदर मातांना त्याचा अधिक फायदा होईल यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

एकूण 7 दुध भुकटी प्रकल्पधारक आणि 37 सहकारी संघ  आणि 11 शासकीय दुध योजना या योजनेत आहेत. महानंदने ही योजना राबकिली. दुधाचा खरेदी दर हा 22 रुपये 10 पैसे ते 27 रुपये प्रती लिटर असा होता, त्यामुळे शेतकर्‍यांचे कमी नुकसान झाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे दूध भुकटीच्या बाबतीत खासदारांमार्फत जोरदार पाठपुरावा करावा अशीही सूचना केली तसेच यासंदर्भात एक पत्रही केंद्राला पाठविण्यात येत आहे असे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भुकटी मुलांना आणि मातांना पुरविण्याचे व्यवस्थित नियोजन करण्यास आणि यात कुठलीही अडचण येऊ न देण्याचे आदेश दिले.

लॉकडाऊनमध्येही शेतकर्‍यांकडून घेतले दूध

राज्य शासनाने लॉकडाऊन परिस्थितीत एप्रिल ते जुलै या कालवधीत 5 कोटी 94 लाख 73 हजार 606 लिटर दूध शेतकर्‍यांकडून घेतले. तर 4927. 702 मेट्रिक टन दूध भुकटीचे उत्पादन केले. तसेच 2575. 171 मेट्रिक टन बटरचेही उत्पादन केले अशी माहिती बैठकीत देण्यात आली. ही भुकटी आणि बटर हे वखार महामंडळाच्या शीतगृहांमध्ये ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या