अमेरिकेत 150 हिंदुस्थानी तरुणांचा छळ, हात पाय बांधून विमानात कोंबलं

2288

अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून गेलेल्या 150 हिंंदुस्थानी तरुणांचा तिथे छळ करण्यात आला असून, हात पाय बांधून त्यांना विमानात कोंबून हिंदुस्थानात पाठवण्यात आले आहे. अवैधरित्या अमेरिकेत प्रवेश केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर बुधवारी हे सर्व तरुण पोहचले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या तरुणांच्या नातेवाईकांना धक्काच बसला. कारण सुट बूट घालून अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या या तरुणांची अवस्था फारच वाईट होती. अंगावर फाटके, मळलेले कपडे, चेहरे उतरलेले, हात पाय बांधलेले, पोट खपाटीला गेलेल्या अनेकजणांच्या पायात चप्पलही नव्हती. आपल्या मुलांना अशा भणंग अवस्थेत बघून अनेक पालकांना रडू कोसळले.

यातील अनेकजण उच्चशिक्षित असून तेथे नोकरी करत होते. तर काहीजण नोकरी मिळवण्यासाठी तिथे गेले होते. तेथे जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एजंटला 25 लाख रुपये दिले होते. आवश्यक कागदपत्रे घेऊनच ते गेले होते. पण तरीही त्यांच्यावर अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना तेथील डिटेंशन कॅम्प मध्ये ठेवण्यात आले होते. अनेकदिवस त्यांना जेवणही देण्यात आले नव्हते. यामुळे ब्रेड आणि पाणी पिऊन दिवस काढावे लागल्याचे तरुणांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या