महानायक अमिताभ मेकअपने हैराण, ब्लॉगवर व्यक्त केली खंत

34

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महानायक अमिताभ बच्चन हे भूमिकेत समरस होण्यासाठीही ओळखले जातात. आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी ते कुठलीही तडजोड करत नाहीत. त्यांच्या भूमिकेला साजेसा मेकअप देखील कायम चर्चेचा भाग राहिला आहे. पण अशीच एक भूमिका करताना त्यांना प्रोस्थेटिक मेकअप करावा लागत आहे. ज्यामुळे ते हैराण झाले असून आपला हा त्रास त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

बच्चन सध्या लखनौमध्ये असून ‘गुलाबो सिताबो’ नावाच्या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात ते एका वयोवृद्धाची भूमिका करत आहेत. भूमिकेतील व्यक्तीरेखेत चपखल बसण्यासाठी त्यांना रोज तीन तास प्रोस्थेटिक मेकअप करावा लागत आहे. हा मेकअप करण्यासाठी त्यांचा नकार नाही. मात्र बरेच दिवसांपासून हा मेकअप करत असल्याने त्याचा त्रास होत आहे. पण जसजसे दिवस जात आहेत. तसे हा मेकअप अंगवळणी पडत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पाश्चात्य चित्रपट निर्मितीमध्ये काही नियम आहेत. त्यानुसार तीन दिवसांपेक्षा जास्त काळ तुम्ही प्रोस्थेटिक मेकअप ठेवू शकत नाहीत. त्यातही जर तुम्हांला हा मेकअप पुन्हा करावा लागणार असेल. तर त्यामध्ये दोन ते तीन दिवसांचे ब्रेक असणे गरजेचे आहे. पण इथे रोज हा प्रोस्थेटिक मेकअप करावा लागत आहे. ज्यामुळे खूप थकवा जाणवत असल्याचं बच्चन यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या