
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात खाण्यापिण्याची निश्चित वेळ नसल्याने ऑसिडिटी होणे स्वाभाविकच… मग त्यावर ‘ऍण्टासिड’ घ्यायची हे ठरलेले… पण सर्वात सुरक्षित मानले जाणारे हेच ‘ऍण्टासिड’ किडनीसाठी खूपच घातक असल्याची भीती ड्रग्स कंट्रोलर जनरल यांनी मंगळवारी व्यक्त केली. त्यांनी एक परिपत्रक जारी करून या औषधाशी संबंधित देशातील सर्व अधिकाऱयांना आणि निर्मात्यांना या औषधाच्या वेस्टनावर ‘किडनीसाठी अतिशय घातक’ अशी सूचना लिहिण्याचे आदेश दिले आहेत.
आम्लपित्तापासून वाचण्यासाठी देशात सर्वत्र ‘ऍण्टासिड’ हे औषध प्रामुख्याने घेतले जाते. मात्र याच औषधाशी संबंधित एक नवा नियम ड्रग्स कंट्रोलर जनरल यांनी मंगळवारी घेतला. त्यांनी देशातील सर्व राज्य नियामक अधिकाऱयांना आणि औषध निर्मात्यांना परिपत्रकाद्वारे म्हटले आहे की, ‘ऍण्टासिड’ या औषधाचा शरीरातील मूत्राशयावर अतिशय वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या औषधांच्या वेस्टनावर ‘किडनीसाठी घातक’ अशी सूचना लिहावी. केवळ ‘ऍण्टासिड’च नव्हे तर ज्या ज्या औषधांमध्ये पेंटोप्राजोल, ओमेप्राजोल, लांसोप्राजोल, एसोमप्राजोल किंवा या सगळ्यांचे अंश असतील ती औषधे किडनीसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे अशा औषधांच्या वेस्टनांवरही तशा प्रकारची सूचना लिहावी असेही ड्रग्स कंट्रोलर जनरल यांनी पुढे स्पष्ट केले आहे.
असे ठरते घातक…गेल्या काही महिन्यांपासून ‘ऍण्टासिड’च्या किंवा ऑसिडिटी घालविण्यासाठी घेतल्या जाणाऱया औषधांच्या घातक परिणामांबाबत अभ्यास सुरू आहे. यातच ‘नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर फॉर फार्माकोविजिलेंस प्रोग्राम’चाही समावेश आहे. यातूनच काही निष्कर्ष निघाले आहेत. पोटात गॅस आणि जळजळ यापासून बचाव व्हावा म्हणून घेतल्या जाणाऱया औषधांमुळे किडनी खराब होऊ शकते. एक्यूट रेनल डिसीज, क्रोनिक किडनी डिसीज किंवा ग्रॅस्ट्रीक कॅन्सर होण्याचीही शक्यता असते असे दिसून आले आहे. ही माहिती नॅफ्रॉलजी जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे.



























































