दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी पहिल्यांदाच मोदींची भेट घेतली. या भेटीचा फोटो पीएमओ कार्यालयाने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे.
आतिशी यांनी 21 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे राजधानी दिल्लीची कमान सांभाळणाऱ्या त्या सगळ्या तरुण महिला मुख्यमंत्रीही ठरल्या आहेत. त्यांच्यासोबत सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनी शपथ घेतली.
Chief Minister of Delhi, @AtishiAAP called on PM @narendramodi. pic.twitter.com/ZDXxMOhURx
— PMO India (@PMOIndia) October 14, 2024
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातून सर्व सामान बाहेर काढल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांच्या खासगी निवासस्थानातून कामकाजाला सुरुवात केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचे सामान फेकून दिल्याचा तसेच कुठलीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप अतिशी यांनी केला आहे. आतिशी यांनी त्यांच्या फेकलेल्या वस्तू खोक्यांमध्ये भरल्या असून त्या खोक्यांसह काम करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अधिकृत पत्र नसल्याचे दिले कारण
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तीन आठवडय़ांनी शिश महल रिकामे करण्यात आले. मधल्या काळात आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे अतिशी या शासकीय निवासस्थानी स्थलांतरित होणार होत्या. त्यानुसार त्या स्थलांतरित झाल्याही, परंतु त्यांच्याकडे याबाबतचे अधिकृत पत्र नसल्याचे कारण देत सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई केली. दरम्यान, दिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिलेल्या निर्देशावरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आतिशी यांनी केला आहे.