वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पूजा खेडकर यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवरील सुनावणी 25 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी न्यायालयाने पूजा खेडकर यांच्या अटकेसाठी अंतरिम सुरक्षा वाढवली आहे. यासह पोलिसांनाही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
खोटी कागदपत्र दाखवत यूपीएससीची फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर आहे. याप्रकरणी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाईही झाली आहे. याच प्रकरणात अटक टाळण्यासाठी पटियाळा हाऊस न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर गुरुवारी सुनावणी पार पडली.
पूजा खेडकर यांनी 2020 पर्यंत एकाच नावाने आठ वेळा यूपीएससीची परीक्षा दिला. त्यानंतर नाव बदलून परीक्षा दिली. यासह त्यांनी अनेक गोष्टी लपवून ठेवल्या आणि कुटुंबाचे उत्पन्न 6 लाख रुपये असल्याची खोटी माहिती दिली. खेडकर कुटुंबाकडे मर्सिडीज, थारसह तीन गाड्या होत्या. असे असतानाही त्यांनी क्रिमीलेयर श्रेणीशी संबंधित खोटी कागदपत्र सादर केली. त्यामुळे या कटात अन्य व्यक्तीही सहभागी असण्याची शक्यता असून त्यांची ओळख पटवण्यासाठी पूजा खेडकर यांची कोठडी आवश्यक आहे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.
न्यायालयाने दिल्ली पोलिसांच्या या मागणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुढील 10 दिवसांमध्ये सविस्तर तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. तपासासाठी अधिकचा वेळ लागू शकतो. जर पूजा खेडकर यांना अटक झाली, तर तुम्ही 60 दिवसात तपास पूर्ण करा आणि जर त्या कोठडीत नसतील तर तुम्ही तुमचा वेळ घेऊ शकता, असा सल्लाही न्यायालायने दिला. त्यामुळे पूजा खेडकर यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.
तपासणीला तयार
दरम्यान, सुनावणीवेळी पूजा खेडकर यांच्या वकील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ लुथला यांनी फिर्यादी वैद्यकीय तपासणीसाठी तयार असल्याचे म्हटले. मी स्वत:ची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तयार आहे. सुरुवातीला ते म्हणाले की मी नाव बदलले, त्यानंतर त्यांनी माझ्या दिव्यांग प्रमाणपत्रावर संशय व्यक्त केला. त्यामुळे मी एम्समध्ये जाण्यासाठी तयार असल्याचे पूजा खेडकर यांनी आपल्या वकिलामार्फत न्यायालयाला सांगितले.