दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या वैद्यकीय तपासणीस ईडीला आक्षेप घेता येणार नाही. ते न्यायालयीन कोढडीत आहेत. ईडीच्या कोठडीत नाहीत. त्यांना एखादा वैद्यकीय दिलासा हवा असेल तर त्याच्याशी तुमचा काहीच संबंध नाही, अशा शब्दांत न्यायालयाने ईडीला दणका दिला.
केजरीवाल यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या कारभाराविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर दिल्लीतील सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने ईडीला फटकारले. ईडी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या वैद्यकीय तपासण्यांशी संबंधित विनंत्यांवर आक्षेप घेऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती मुकेश कुमार ईडीला उद्देशून म्हणाले. केजरीवाल यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल तेव्हा त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांना व्हिडीयो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहण्याची मुभा द्यावी, अशी विनंती न्यायालयात केली होती. त्यानुसार न्यायालयाने तुरुंग अधीक्षकांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
केजरीवाल यांच्या पत्नीला व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहण्याची मुभा देण्याबद्दल अहवाल मागवावा असे ईड़ीचे वकील म्हणाले.
जामीन याचिकेवर 19 जूनला सुनावणी
केजरीवाल यांनी जामिनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर 19 जून रोजी सुनावणी होणार आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. केजरीवाल यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या प्रचारादरम्यान ते आजारी आहेत असे जाणवले नाही, असे न्यायालयाने नमूद केले होते.