
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या बाराव्या हंगामात विराट कोहलीच्या ‘रॉयल चॅलेंजस,& बंगळुरू’ संघाचा रविवारी खेळ खल्लास झाला. बंगळुरू हा प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिला संघ ठरला. आता उर्वरित दोन लढती या विराट कोहलीच्या सेनेसाठी केवळ औपचारिकता असेल. दुसरीकडे ‘दिल्ली कॅपिटल्स’ने बंगळुरूचा 16 धावांनी पराभव करून प्ले ऑफच्या गटात मजल मारली आहे. ‘सामनावीरा’ची माळ सलामीवीर शिखर धवनच्या गळय़ात पडली. ‘दिल्ली कॅपिटल्स’कडून मिळालेल्या 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूचा डाव 7 बाद 171 धावसंख्येवरच मर्यादित राहिला.
धवन-अय्यर यांची अर्धशतके
त्याआधी, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमान दिल्ली कॅपिटलने 5 बाद 187 धावसंख्या उभारली. उमेश यादवने चौथ्या षटकात पृथ्वी शॉला (18) यष्टीमागे पार्थिव पटेलकरवी झेलबाद करून बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सला पहिले यश मिळवून दिले. मात्र, त्यानंतर दुसरा आघाडीवीर शिखर धवन (50) व आलेला कर्णधार श्रेयस अय्यर (52) यांनी दणकेबाज अर्धशतके झळकावून बंगळुरूच्या गोलंदाजांना तरसवले. या दोघांनी दुसऱया गडय़ासाठी 68 धावांची भागीदारी करीत ‘दिल्ली कॅपिटल्स’ला शंभरी ओलांडून दिली.
गुरकिरत-स्टोइनिस लढले, पण…
गुरकिरत सिंग (27) व मार्कस स्टोइनिस (नाबाद 32) यांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. इशांत शर्माने गुरकिरतला यष्टीमागे पार्थिव पटेलकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर कॅगिसो रबाडानेही टिच्चून गोलंदाजी करीत विजय ‘दिल्ली कॅपिटल्स’च्या हातातून निसटणार नाही याची काळजी घेतली. स्टोइनिसला नाबाद राहूनच बंगळुरूचा पराभव पाहावा लागला. ‘दिल्लीच्या रबाडा आणि अमित मिश्रा यांनी 2-2 गडी बाद केले.

























































