दिल्ली डायरी – ‘बुडता’ पंजाब आणि तरारलेले राजकारण

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

पंजाब व हिमाचलचा हवाई दौरा करून मोदींनी पूरग्रस्तांचे अश्रू पुसले, मात्र त्याच वेळी त्यांच्या तोंडाला पानेही पुसली! या दौऱयावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी मोदींबरोबर ‘सुरक्षित अंतर’ राखले. एरव्ही अरविंद केजरीवाल चंदिगडमध्ये तंबू ठोकून असतात. मात्र पूर आल्यापासून त्यांनी दिल्लीत आश्रय घेतल्याची टीका भाजपच्या गोटातून होत आहे. दोन्ही बाजूंचा टीकेचा सूर हा उबग आणणारा आहे. पंजाबची बुडता अशी अवस्था झालेली असताना राजकारण मात्र नेहमीप्रमाणे तरारलेले आहे हे अधिक दुर्दैवी आहे.

महापुराने पंजाबची अवस्था ‘बुडता’ अशी झाली आहे. महापुराने पंजाबातल्या 23 जिह्यांना वेढा टाकला होता. हाच पंजाब ड्रग्ज माफियांमुळे यापूर्वी ‘उडता’ असा ओळखला जात होता. ‘उडता पंजाब’ असो की ‘बुडता पंजाब’, मुळात जाऊन प्रश्न सोडविण्याची कोणत्याच राजकीय पक्षाची इच्छा नाही. त्यामुळे संपूर्ण पंजाब जलमय झालेला असताना पंजाबला केंद्रीय सरकारने दिलेल्या सोळाशे कोटी रुपयांच्या पॅकेजवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पंजाबला मदत करताना केंद्रातील मोदी सरकारने हात आखडता घेतला हे उघडच आहे. एकीकडे काँग्रेसशासित हिमाचल प्रदेशसारख्या छोटय़ा राज्याला दीड हजार कोटींची मदत करायची. मात्र पंजाबसारख्या मोठय़ा राज्याला त्यापेक्षा फक्त शंभर कोटी जास्त द्यायचे. म्हणजे अर्थसहाय्यामध्येही भेदाभेद करून कॉंग्रेस व आपमध्ये कशी परस्पर भांडणे लागतील, याचीही ‘काळजी’ मोदींच्या सरकारने घेतली आहे. राजकारण कधी, कुठे आणि कशा पातळीवर करावे, याचा धरबंद सध्याच्या सत्ताधाऱयांनी सोडल्याने प्रश्न अधिक जटिल झाले आहेत. पंजाब पुरात वाहून जाईल, अशी स्थिती असताना उशिरा का होईना पंतप्रधानांना पंजाबचा दौरा करण्याची आठवण आली. पंजाब व हिमाचलचा हवाई दौरा करून मोदींनी पूरग्रस्तांचे अश्रू पुसले, मात्र त्याच वेळी त्यांच्या तोंडाला पानेही पुसली! या दौऱयावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी मोदींबरोबर ‘सुरक्षित अंतर’ राखले, त्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एरवी अरविंद केजरीवाल चंदिगडमध्ये तंबू ठोकून असतात. मात्र पूर आल्यापासून त्यांनी दिल्लीत आश्रय घेतल्याची टीका भाजपच्या गोटातून होत आहे. दोन्ही बाजूंचा टीकेचा सूर हा उबग

आणणारा आहे.

पंजाबमध्ये केंद्रातील भाजप सरकार व विशेषतः नरेंद्र मोदींबद्दल नागरिकांमध्ये कमालीचा रोष असल्याने मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी मोदींची भेट जाणीवपूर्वक टाळल्याची चर्चा जोरात ऐकायला मिळते. मोदी पंजाबमध्ये दाखल होण्यापूर्वी एक दिवस अगोदरपर्यंत कॅबिनेट बैठक घेणारे मान अचानक आजारी कसे पडले, ऍडमिटच कसे झाले याच्या सुरस कहाण्या ऐकायला मिळत आहेत. मान यांचे हे दुखणे शारीरिक नसून ‘राजकीय’ असल्याचे स्पष्ट आहे. पंतप्रधानांसोबत ‘दिसणे’ हेही एका राज्याच्या मुख्यमंत्र्यासाठी अडचणीचे ठरावे ही मोदींच्या कार्यपद्धतीची शोकांतिका मानावी लागेल. पंजाबमधील भीषण स्थिती लक्षात घेऊन अनेक क्रिकेटपटू, अभिनेते, गायक या मंडळींनी मदतीचा हात पुढे केला. मात्र राजकारण्यांचे हात एकमेकांचे तंगडे ओढण्यासाठीच पुढे आले. पंजाबमधली स्थिती नियंत्रणात ठेवण्यात मान सरकार अपयशी ठरले असले तरी केंद्र सरकारचीही तितकीच जबाबदारी आहे.

दलालांचे राज्य

राजकारणात ‘दलालां’चे महत्त्व अपरंपार आहे. अमेरिकेत दलालांना कायदेशीर मान्यता आहे आणि आपल्याकडे नाही. इतकाच काय तो फरक. मात्र दलालांची प्रतिष्ठा ही सेमच. या दलालांशिवाय सत्ताधाऱयांचे पानही हलू शकत नाही. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, दिल्लीतली दलाली आम्ही संपवली, अशा वल्गना भाजप सरकार करत असले तरी त्यात काही तथ्य नाही. उलट नवदलालांचा आविष्कार याच काळात झाला व तो जगाने पाहिला. दलालीबद्दल एवढे चऱहाट लावण्याचे कारण म्हणजे भारताविरोधात व आपले ‘प्रिय मित्र’ असलेल्या नरेंद्र मोदींविरोधात कठोर भूमिका घेणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तात्यांचे अचानकच झालेले हृदय परिवर्तन! बरं, हे तात्या म्हणजे काही साने गुरुजींसारखे कनवाळू वगैरे मनाचे गृहस्थ नाहीत. 50 टक्के टॅरिफ लावून भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान तात्यांनी रचले तेच तात्या अचानकपणे पुन्हा भारताच्या प्रेमात कसे काय पडले? खुमासदार माहिती हाती लागली आहे. अमेरिकेत लॉबिस्ट (वाईट शब्दांत दलाल) खूप पॉवरफूल मानले जातात. ते कोणत्याही थराला जाऊन कुठलेही काम करू शकतात. ट्रम्प तात्यांचे हृदयपरिवर्तन करण्यासाठी आपल्या पंतप्रधानांनी जेसन मिलर यांची वार्षिक पंधरा कोटी रुपये मानधन देऊन नियुक्ती केली. भारत-पाक युद्ध मीच थांबवले, अशी सतत जपमाळ ओढणारे तात्या आता यावर काही बोलेनासे झालेत. टॅरिफचा ‘ट’देखील उच्चारत नाहीत. भारत हा अमेरिकेचा जुना मित्र असल्याची कबुली द्यायला लागलेत. म्हणजे मिलर यांची दलाली कामाला येते आहे, असे दिसत आहे. अर्थात दलालच सगळी मोहीम फत्ते करणार असतील तर जयशंकर, अजित डोवाल यांच्यासारख्या अतिविद्वान मंडळींची गरज ती काय? अमेरिकेत अधिकृत असलेले दलालांचे राज्य आपल्याकडे अनधिकृतपणे बेमालूमपणे सुरू आहे हाच त्याचा मथितार्थ.

नवे उपराष्ट्रपती

सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखे विद्वान राष्ट्रपती पदावर विराजमान असताना तामीळनाडूच्या कोईमतूरमध्ये एका गावात एका बाळाचा जन्म झाला. सर्वपल्ली राधाकृष्णन हे समाजात आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. तीच प्रेरणा घेऊन त्या आईने मुलाचे नाव राधाकृष्णन ठेवू या, अशी सूचना आपल्या पतीला केली. त्या वेळचे ते नवजात शिशू म्हणजे देशाचे नवीन उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन! दस्तुरखुद्द राधाकृष्णन यांच्या मातोश्री अम्माल यांनीच ही नामकरणाची रंजक कहाणी सांगितली आहे. राजकारणात कर्तृत्वाबरोबरच नशिबाची साथही तितकीच महत्त्वाची. ‘तामीळनाडूचे वाजपेयी’ अशी ओळख असलेले राधाकृष्णन नव्वदच्या दशकात केवळ एकदाच खासदार झाले तेही निसटत्या मतांनी. त्यानंतर ते तसे कधीच सक्रिय राजकारणात नव्हते. मात्र नंतरच्या काळात त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. दरम्यानच्या काळात त्या वेळचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड व केंद्र सरकारमध्ये ताणतणाव निर्माण झाला. त्याला अनेक कंगोरे आहेत, त्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात धनखड यांची विकेट गेली. धनखड यांच्या जागी राधाकृष्णन आता विराजमान झाले. राधाकृष्णन यांनी राज्यसभेसारखे वरिष्ठ सभागृह जबाबदारीने चालवून त्या सभागृहाची उंची वाढवावी हीच अपेक्षा !