दिल्ली डायरी- नितीशबाबू, जरा जपून!

>> नीलेश कुलकर्णी  

बिहार विधानसभेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी त्याचे पडघम वाजू लागले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजकीय कारकीर्दीचा फैसला ही निवडणूक करेल. सवयीप्रमाणे भाजपने तेथे नितीशकुमार यांचे पाय खेचण्याचे उद्योग सुरू केले आहेत. नितीशकुमार हे दुधखुळे नाहीत. त्यामुळे त्यांनीही प्रतिडाव खेळायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखाली आघाडीमध्येही अशीच ‘अनेक पायांची शर्यत’ दिसत आहे. अर्थात, मुख्य प्रश्न भाजप नितीशकुमार यांना किती अपशकुन करतो हा आहे. पाचवेळा बिहारसारख्या राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले मातब्बर नितीशबाबू हे सर्वांना पुरून उरले तर हीरो’च ठरतील. तूर्तास नितीशबाबू जरा जपूनच! 

बिहार विधानसभेचे पडघम आता जोरात वाजत आहे नितीशबाबू तथाकथित एनडीएच्या पालखीचे भोई आहेत खरे, मात्र त्यांच्या पायाखालचे जाजम ओढण्याचा प्लॅन दिल्लीतून आखण्यात आला आहे. या नियोजनानुसारच दिल्लीतून इंधन भरल्यानंतर लोकजनशक्ती पक्ष आता नितीशबाबूंविरोधात बंडाचा ‘चिराग’ पेटवताना दिसत आहे. आमची युती भाजपशी आहे, जेडीयूशी नाही असा पवित्रा घेत पासवान पितापुत्रांचा नितीशकुमार यांच्या विरोधातली ‘ऍण्टी इनकम्बनसी’ एन्कॅश करण्याचा आणि सत्तेच्या घोड्यावर स्वार होण्याचा मनसुबा आहे. मित्रपक्षाच्या अंगाखांद्यावर खेळत त्याच मित्रपक्षाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची भाजपची ‘परंपरा’ आहे. अकाली दलाने नुकताच याचा अनुभव घेतला आहे. नितीशबाबूंनी त्यापासून योग्य तो बोध घेतलेला बरा!

बिहारची निवडणूक अजून जाहीर झाली नसली तरी तिथे ‘आघाडी अंतर्गत आघाडी’ असा नवा गमतशीर फॉर्म्युला आकाराला येत आहे. बिहारचे पहिले मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांनी आरक्षणांतर्गत आरक्षणचा फॉर्म्युला बिहारमध्ये राबवला होता. आता हा नवा निवडणूक फॉर्म्युला नितीशकुमार, लालू, रामविलास पासवान या जयप्रकाश नारायणांच्या शिष्योत्तमांनी तयार केला आहे. नितीशबाबूंच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखाली यूपीए अशा दोन आघाडय़ांमध्ये ही राजकीय लढाई होणार आहे. तथापि, त्या ठिकाणी कोणाचा कोणाला पायपोस नाही अशी स्थिती आहे. मात्र रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग यांनी नितीशबाबूंविरोधात बंडाची भाषा केल्यानंतर आता जनता दलाचे नेते आमची युती फक्त भाजपशी आहे, लोकजनशक्ती पक्षाशी नाही, असा खुलासा करत फिरत आहेत तर दुसरीकडे पासवानही हीच ‘भाषा’ बोलत आहेत. पासवानांचा नक्षा उतरविण्यासाठी नितीशबाबूंनी माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझींना आघाडीत आणले. आता हेच मांझी आमची युती नितीशबाबूंशी आहे, भाजपशी नाही असा पवित्रा घेत आहेत. एनडीएतील घटक पक्षांचे पाय  अशा पद्धतीने एमेकांत अडकलेले आहेत, तर यूपीएमध्येही हाच फॉर्म्युला आकाराला आला आहे. राष्ट्रीय जनता दलाने डाव्यांना आपल्या आघाडीत घेतल्याने विरोधकांचा ‘बॅलन्स’ बिघडण्याची चिन्हे आहेत. लालूंना आपल्या कोटय़ातून सीपीआय (एमएल)ला जागा सोडाव्या लागतील तर काँग्रेसला माकपा, राष्ट्रीय लोकसमता पार्टीला जागा सोडाव्या लागतील. त्यामुळे एकमेकांच्या जागा पाडण्याचाच खेळ यावेळी रंगण्याची शक्यता दिसत आहे.

चिराग पासवान यांनी नितीशबाबूंविरोधात हल्लाबोल केल्यामुळे खळबळ वगैरे उडाली आहे. मात्र चिराग यांना पुढे करून युती झाल्यानंतरही संयुक्त जनता दलाच्या उमेदवारांपुढे पासवान यांच्या पक्षाचा उमेदवार उभे करायचे राजकारण शिजले आहे. मुख्यमंत्री नितीशबाबूंना बहुमतापासून दूर राखायचे आणि भाजपचे संख्याबळ संयुक्त जनता दलापेक्षा वाढवायचे, अशी ही ‘रणनीती’ आहे.  अर्थात भाजपच्या या दुटप्पी खेळीची जाणीव नसण्याइतपत नितीशकुमार दुधखुळे नाहीत. त्यामुळेच नितीशबाबूंनी जुने ‘गले शिकवे’ विसरून जीतनराम मांझींना सोबत आणले. भाजपचाच फॉर्म्युला ते रामविलास पासवान यांच्या पक्षाविरोधात उमेदवार उभे करून अमलात आणतील. तथापि मांझी यांची राजकीय ताकद खूपच मर्यादित आहे. त्यामुळे नितीशबाबूंची या निवडणुकीत पुरती दमछाक होण्याची शक्यता आहे. ‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा’ अशा आशयाची एक म्हण आहे. अकाली दलानंतर नितीशबाबू त्याचा पदोपदी अनुभव घेत आहेत. पाचवेळा बिहारसारख्या राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले मातब्बर नितीशबाबू हे सर्वांना पुरून उरले तर हीरो’च ठरतील. तूर्तास नितीशबाबू जरा जपूनच!

‘वांदा’ आणि ‘लठ्ठालठ्ठी’

कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातल्यामुळे देशभरात शेतकऱ्य़ांमधील असंतोष उफाळून आला आहे. त्यात आता बांगलादेशही या निर्णयामुळे सरकारच्या या निर्णयामुळे खवळला आहे. हिंदुस्थानी कांदा आणि बांगलादेशचे नाते तसे जुने आहे. मात्र कांदा निर्यातीच्या मुद्दय़ावर मोदी सरकारमधील परराष्ट्र आणि वाणिज्य अशा दोन मंत्रालयातच ‘लठ्ठालठ्ठी’ सुरू आहेत. कांद्याचे अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन होण्याची चिन्हे दिसताच सरकारने मागचापुढचा विचार न करता कांदा निर्यातीवर बंदी घातली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कांद्याची किंमत नियंत्रित करण्यासंदर्भात बनविण्यात आलेल्या मंत्रीगटाचे प्रमुख आहेत. तब्येतीच्या कारणाने शहा रुग्णालयात दाखल झाले आणि इकडे कांद्याचेही बेहाल झाले. हिंदुस्थानने या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे बांगलादेश चांगलाच खवळला. कारण बांगलादेश हा सुरुवातीपासूनच हिंदुस्थानी कांद्याचा प्रमुख आयातदार देश आहे. तेथील जनता कांद्याच्या बाबतीत ‘आत्मनिर्भर’ नाही. हिंदुस्थान व बांगलादेशात यापूर्वी झालेल्या करारानुसार पूर्वसूचनेशिवाय हिंदुस्थान बांगलादेशला होणारी कांदा निर्यात थांबवू शकत नाही, मात्र देशाचे परराष्ट्रमंत्री जयशंकर अगदी हळूवार आवाजात या कराराची ‘आठवण’ वाणिज्य मंत्रालयाला करून देत असले तरी वाणिज्य मंत्रालय त्याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचे आदेश ‘वरून’ आलेले आहेत असे सांगून जयशंकर यांची बोळवण करण्यात आली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या कारनाम्यामुळे कांद्याच्या पातीशीही संबंध नसताना जयशंकर सध्या बांगलादेशात ‘व्हिलन’ बनले आहेत.

आपला तो बाब्या…

देशातील बिगरशासित राज्यांत कायदा-सुव्यवस्थेचा गळा घोटला गेला आहे, मानवाधिकार धोक्यात आहे, राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी पोपटपंची भाजपची मंडळी उठताबसता करत असतात. मात्र त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी केलेल्या गुंडगिरीबद्दल आणि मध्य प्रदेशच्या भाजप सरकारच्या मंत्री उषा ठाकूर यांच्या कारनाम्याबाबत भाजपची मंडळी व सोशल मीडियावरील भक्त मंडळींनी गुळणी धरली आहे. त्रिपुरातील कोरोनाची स्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री बिप्लव देव अपयशी ठरत आहे. तशा बातम्या पत्रकारांनी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विपर्यस्त बातम्या देणाऱ्य़ा पत्रकारांना बघून घेण्याची धमकी दिली. मुख्यमंत्री महोदयाच्या धमक्यानंतर काही तासांतच पराशर विश्वास व अशोक दासगुप्ता या दोघांवर अज्ञातांनी भयंकर हल्ला केला. हा हल्ला कोणी केला हे अजून स्पष्ट झाले नसले तरी मुख्यमंत्र्यांची भाषा नक्कीच शोभनीय नाही. मात्र बिप्लव देव यांचा कोणी भाजपाईंनी निषेध केल्याचे किंवा कोणी त्यांना चार गोष्टी युक्तीच्या सांगितल्याचे अजून तरी दिसून आलेले नाही. तिकडे मध्य प्रदेशच्या मंत्री उषा ठाकूर यांच्याही शासकीय वाहनावर तिरंगा उलटा फडकत होता. काही सुजाण नागरिकांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर मंत्रीमहोदयांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर दबाव वाढल्यानंतर ठाकूर यांनी माफी मागितली, मात्र असा उलटा तिरंगा दुसऱ्य़ा कोणत्याही पक्षाच्या नेत्याकडून फडकला गेला असता तर भक्तमंडळींनी त्याच्यावर ‘देशद्रोहा’चा शिक्का मारला असता. मात्र ‘आपला तो बाबा आणि दुसऱ्य़ाचे ते कार्ट’ असा भेदभाव सध्या सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या