दिल्ली डायरी – पीपीई किट घोटाळ्याचे नवे मॉडेल

1514

>> नीलेश कुलकर्णी

देवभूमी हिमाचल प्रदेशात कोरोनाच्या भीषण संकटात पीपीई किटच्या घोटाळ्याने सत्ताधारी भाजपचे पितळ उघडे पडले आहे. अर्थात हिमाचल ‘देवभूमी’ वगैरे असली तरी भ्रष्टाचार काही या पवित्र भूमीला नवा नाही. वेगवेगळ्या घोटाळ्यांनी हिमाचल प्रदेश गाजले आहे. मात्र कोरोनासारख्या संकटात जनतेच्या जीविताशी निगडित गोष्टीमध्ये भ्रष्टाचार होणे अधिक गंभीर आहे. या प्रकरणी तेथील भाजप प्रदेशाध्यक्ष बिंदल यांनी राजीनामा दिला आहे. तथापि ‘व्हेंटिलेटर घोटाळ्या’मुळे भाजपशासित ‘गुजरात मॉडेल’ची बदनामी जगभरात होत असताना हिमाचलमधील पीपीई किट घोटाळ्याचे ‘नवे मॉडेल’ समोर आले आहे.

कोरोनाशी लढताना जनता जीवन आणि मरणाच्या हिंदोळ्यावर आहे. अशावेळी हिमाचलसारख्या देवभूमीत भाजप सरकारच्या कार्यकाळात झालेला पीपीई किट घोटाळा गंभीर आहे. कोरोनाच्या संकटात कोणत्याही बिगर भाजप सरकारांमध्ये असे भ्रष्टाचाराचे प्रकरण अद्याप तरी समोर आलेले नाही. हाच घोटाळा एखाद्या बिगर भाजपशासित राज्यात झाला असता तर भक्तमंडळींनी कोरोनापेक्षाही जास्त धुमाकूळ घातला असता. अर्थात हिमाचल `देवभूमी’ वगैरे असली तरी भ्रष्टाचार काही या पवित्र भूमीला नवा नाही. माजी मुख्यमंत्री सुखराम यांचा टेलिकॉम घोटाळा आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्रिंसग यांचेही घोटाळे गाजलेच होते. भाजपचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्या घोटाळ्यांचीही दबक्या आवाजात अधूनमधून चर्चा होत असते. मात्र कोरोनासारख्या संकटात जनतेच्या जिविताशी निगडित बाबींमध्ये भ्रष्टाचार होणे चिंताजनक आहे. त्यातही हिमाचलचे सुपुत्र जे. पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे हे प्रकरण भाजपसाठी अधिकच अडचणीचे ठरले आहे. आता हिमाचलचे भाजप प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा वगैरे दिला आहे, पण `जो बूंद से गयी वो हौद से नही आती’. हिमाचल सरकारचे `शुद्धीकरण’ आता पंतप्रधानांनाच करावे लागेल.

हिमाचलमध्ये प्रेमकुमार धुमल नाकापेक्षा मोती जड होतील, म्हणून मोदी-अमित शहा यांच्या कृपेने कोणालाही माहित नसलेले जयराम ठाकूर अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान झाले. शांताकुमार नावाचे सज्जन गृहस्थ आणि माजी मुख्यमंत्री कधीच ‘मार्गदर्शक मंडळा’त स्थानापन्न झाले आहेत. त्यामुळे जयराम ठाकूर यांची ‘लॉटरी’ लागली. मात्र नोकरशाही आणि भाजपची नेतेमंडळी  ठाकूर यांच्या नियंत्रणात राहिली नाही. त्यातच कोरोनाचे संकट थैमान घालत असताना हिमाचलचे आरोग्य सचिव अजय गुप्ता यांनी पीपीई किटसंदर्भातील व्यवहारांत भ्रष्टाचार केला. त्याची ऑडिओ क्लिप `व्हायरल’ झाली आहे. त्यात पार्टी विथ डिफरन्समधील विविध नेत्यांची नावे असल्याचे बोलले जाते. हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून प्रदेशाध्यक्ष बिंदल यांनी नैतिकतेचा आव आणून राजीनामा दिला. या प्रकरणाशी भाजपचा संबंध नाही, हे सांगायला ते विसरले नाहीत. ‘व्हेंटिलेटर घोटाळ्या’मुळे भाजपशासित ‘गुजरात मॉडेल’ची बदनामी जगभरात होत असताना हिमाचलमधील पीपीई किट घोटाळ्याचे ‘नवे मॉडेल’ समोर आले. पारदर्शक कारभाराची ग्वाही देणारे पंतप्रधान व गृहमंत्री बहुधा लॉक डाऊनच्या कामात बिझी आहेत. त्यामुळेच अजून तरी त्यांच्याकडून या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही. लॉक डाऊन झाल्यानंतर साफसफाई ते करतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हिमाचलच्या घोटाळ्याने भाजपच्या प्रतिमेला धक्का बसला आहे हे नक्की.

रेणुकासिंग यांची दादागिरी अन् मनोज तिवारींचे क्रिकेट

सार्वजनिक जीवनात सभ्यतेने वागा, सत्तेची मस्ती दाखवू नका, असे आवाहन पंतप्रधानांनी अनेक वेळा करूनही ते भाजप नेतेमंडळींच्या डोक्यात शिरताना दिसत नाही. छत्तीसगढचे प्रतिनिधित्व करणार्‍या रेणुकासिंग यांचा `दादागिरी’ करणारा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री असलेल्या रेणुकासिंग यांनी बलरामपूरच्या क्वारंटाईन सेंटरला भेट दिली. तिथे काही प्रमाणात असुविधा होत्या. त्या पाहून रेणुकाजींच्या रागाचा पारा चढला. अधिकार्‍यांना उद्देशून त्यांनी दादागिरीची भाषा केली. ‘तुमची असली थेरं चालणार नाहीत. आमचे येथे पंधरा वर्षे राज्य होते हे विसरू नका. दिल्लीत आमची सत्ता आहे. तुमच्यासारख्यांना खोलीत बंद करून बेल्टचे फटके कसे मारायचे हे मला माहिती आहे, असे वादग्रस्त विधान रेणुका यांनी केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. कामचुकार अधिकार्‍यांना वठणीवर आणण्याचा रेणुका यांचा उद्देश प्रामाणिक असला तरी देशाच्या मंत्र्याच्या तोंडी ही भाषा शोभणारी खचितच नाही. दुसरीकडे भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी लॉकडाऊनचे नियम सर्वत्र कडक असताना क्रिकेटची बॅट घेऊन `तुफान बॅटिंग’ केली. माजी आंतरराष्टीय क्रिकेटपटू असतानाही खासदार गौतम गंभीर यांनी बॅटचा मोह टाळला. मात्र तिवारींनी मनोसक्त क्रिकेट खेळून लॉक डाऊनच्या उद्देशालाच हरताळ फासला.

राष्ट्रपतींचा नवा आदर्श

राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद यांनी राष्ट्रपती भवनातील कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांसाठी शिलाई मशीनवर मास्क शिवतानाचे फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते. त्यांचे हे कार्य कौतुक करण्यासारखेच आहे. आता महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोरोनाच्या संकटकाळात एक नवा आदर्श घालून दिला आहे. राष्ट्रपतींनी सर्वप्रथम पीएम केअर फंडामध्ये मदतनिधी जमा करून त्याचा एकप्रकारे श्रीगणेशाच केला. त्यानंतर आपल्या वेतन आणि भत्त्यामध्ये तीस टक्के कपात करण्याचा निर्णयही जाहीर केला आहे. इतकेच नाही तर राष्ट्रपती भवनासाठी नवी लिमोजिन कार खरेदी केली जाणार होती. मात्र राष्ट्रपतींनी तो निर्णय रद्द केला आहे. राष्ट्रपती भवनातील फुल बगीच्यांवर होणार्‍या वारेमाप खर्चाला त्यांनी कात्री लावली आहे. या अलिशान वास्तूत नेहमीच कोणते ना कोणते दुरुस्तीचे काम सुरू असते. राष्ट्रपतींनी त्याला बंदी केली आहे. राष्ट्रपती भवनात येणार्‍या पाहुण्यांची यादीही आता छोटी करण्यात आली असून अवाढव्य मेन्यूला कात्री लावण्यात आली आहे. विदेश यात्रांवरचा खर्च अर्ध्यावर आणण्याचा निर्णय राष्ट्रपतींनी घेतला आहे. जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आता राष्ट्रपती ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर करणार असून ते ‘अ‍ॅप’ विकसित करण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटात राष्ट्रपती महोदयांचे हे निर्णय कौतुकास्पदच आहेत. त्यांना सलाम!

आपली प्रतिक्रिया द्या