दिल्ली डायरी : महागाईचा भडका, रुपयाची घसरण अन् ‘न्यू इंडिया’

 

>>नीलेश कुलकर्णी   

देशात सध्या महागाईच्या भस्मासुराने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. प्रपंच चालताना ‘आम आदमी’ मेटाकुटीला आला आहे. तिकडे रुपयाने मान टाकली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांचे स्टिरॉईड देऊन, फसवी आकडेवारी फेकून आर्थिक विकासाचे ढोल सरकार अधूनमधून बडत असले तरी विद्यमान राजवटीत हिंदुस्थान हा जगातील सर्वाधिक बेरोजगारांचा देश बनला आहे हे आता लपून राहिले नाही. सरकारने कोंबडे कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी मोदींच्या ‘न्यू इंडिया’तील वास्तव हेच आहे.  

2014  च्या लोकसभा निवडणुकीत ‘कब तक सहेनी पडेगी महंगाई की मार अब की बार..’ चा नारा देण्यात आला होता. मात्र हा नाराही ‘अच्छे दिन’ सारखा गाजरच ठरला. महागाई कमी करणे तर दूर, उलट नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या भंपक निर्णयामुळे सामान्य माणसाला रोजचे जगणे मुश्कील होऊन गेले आहे. अशा विपरित स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ करण्यात मश्गुल आहेत. ‘न्यू इंडिया’ चा नारा मध्यंतरी पंतप्रधानांनीच दिला होता. मात्र महागाईचा उसळलेला आगडोंब, घसरत चालेलला रुपया आणि रोजगाराकडे आस लावून असलेले बेरोजगारांचे थवेच्या थवे पाहिले की मोदीजी, आम्हाला नको तुमचा तो ‘न्यू इंडिया’ असे म्हणण्याची वेळ दुर्दैवाने जनतेवर आली आहे. यूपीए सरकारला जनतेने लाथा घालून सत्तेतून बेदखल केले त्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे वाढती महागाई. घराघरातील गृहिणींना आपले किचन सांभाळता सांभाळता नाकीनऊ येत असताना काँग्रेसी सरकारात कोट्यवधींचे घोटाळे उघडकीस आल्याने देशभरातील आयाबहिणींनी सरकारविरोधात आक्रोशाचे लाटणे उगारले आणि काँग्रेसला सत्तेतून बेदखल व्हावे लागले. त्याचवेळी ‘गुजरात मॉडेल’ला भुलून आणि काँग्रेसच्या नाकर्तेपणाला कंटाळून नरेंद्र मोदी नावाचा सामान्य कुटुंबातून पुढे आलेला नेता आपल्यासाठी नक्कीच काहीतरी करेल या आशेने देशातील जनतेने जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन ‘अच्छे दिन’च्या घोषणेला भुलून मोदींना प्रचंड बहुमताने पंतप्रधानपदावर बसवले. मात्र जनहिताची कामे करण्याऐकजी नोटाबंदी, जीएसटीसारखे नसते उद्योग मोदी सरकारने केल्यामुळे जनतेचे जगणे मुश्कील झाले. एक ते ‘जॅकेट’ सोडले तर अच्छे दिन जाड भिंगाच्या चष्म्यातून शोधण्याची वेळ जनतेवर आली आहे.

यूपीएच्या राजवटीत आर्थिक विकासाचा दर आठ टक्क्यांच्या आसपास होत़ा तो कायम ठेवताना मोदींची दमछाक झाली. जागतिक तेल बाजारातील घसरणीमुळे  2014 ते 17 दरम्यान महागाईचा दर कमी राहिला, पण चालू वर्षात महागाईची ‘डायन’ पुन्हा घुमू लागली आहे. आता जागतिक बाजारात तेलाचे दर चढत असताना याच तेलात पकोडे तळून रोजगार मिळविण्याचा सल्ला देत पंतप्रधान मोदींनी बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळले. ‘आयएलओ’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये बेरोजगारीचा दर 3.5 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने सत्तरी केव्हाच पार केली आहे. मनमोहन सिंग सरकारविरोधात ‘रुपयाचे अवमूल्यन केले हो’, अशी आवई उठवणारे आज सत्तेत आहेत. तरी रुपयाची अप्रतिष्ठा सुरूच आहे. नोटाबंदीचा निर्णय देशाला आर्थिक अराजकाच्या खाईत लोटणारा होता हे काळाच्या कसोटीवर उशिरा का होईना सिद्ध झाले. ‘इतिहास माझे योग्य ते मूल्यमापन करेल’, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पायउतार होण्यापूर्वी म्हणाले होते. सातेक वर्षे अर्थव्यवस्था स्थिर ठेवल्यानंतर अखेरच्या दीडेक वर्षात ती झपाट्याने खालावली आणि महागाईचा आगडोंब उसळला. बेरोजगारीचे थैमान माजले. घराघरांतील गृहिणींनी सरकारवर लाटणे उगारले तर बेरोजगारांनी मुठी आवळून यूपीए सरकारचा पालापाचोळा केला. इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते. खोट्या भूलथापा आणि आकडेवारींची खैरात करून ‘न्यू इंडिया’ चा पाळणा कधीच हलणार नाही. ही परिस्थिती सुधारली नाही तर या सरकारचीही अवस्था यूपीएसारखी व्हायला वेळ लागणार नाही.

अमितभाई को गुस्सा क्यों आता है..?

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी ‘इव्हेंट’ बनविल्याची टीका राजकीय कर्तुळातून होत असताना अटलजींच्या नातेवाईक असणार्‍या करुणा शुक्ला यांनी अंत्ययात्रेत पाच क़ि म़ी पायी चालत जाण्यापेक्षा वाजपेयींच्या आदर्शावर वाटचाल केली असती तर बरे झाले असते, अशा शब्दांत कानपिचक्या दिल्याने मोदी-शहा जोडीची चांगलीच गोची झाली आहे. अटलजींच्या अंत्यदर्शनास विलंबाने येऊन यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका ओढवून घेतल्यानंतर शाह यांनी दटावल्यामुळे अटलजींच्या अस्थिविसर्जनावेळी योगी हरिद्वारला हजर राहिले, मात्र हरिद्वारमध्ये भलताच प्रकार घडल्यामुळे अमित शहा यांच्या रागाचा भडका उडाल्याची चर्चा आहे. अटलजींच्या अस्थिविसर्जनासाठी अमित शाह वाजपेयींच्या कुटुंबीयांसमवेत हरिद्वारला पोहचले आणि त्यांनी मोठ्या आस्थेने हरिद्वारच्या प्रसिद्ध असलेल्या ‘हरी की पौडी’ येथे गंगेत अटलजींच्या अस्थी विसर्जितही केल्या. हा सगळा विधी आटोपून परत आपल्या ताफ्याकडे जाताना, आपल्यासकट वाजपेयींच्या कुटुंबीयांच्याही चपला हरिद्वारमधील भुरट्यांनी लंपास केल्याचे अमितभाईंच्या लक्षात आले. मग काय अध्यक्षजींच्या चपला गायब झाल्याने एसपीजी कमांडोही ‘शोधमोहिमे’ला लागले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंदसिंग रावत यांचे तर धाबेच दणाणले. त्यांनीही यंत्रणा कामाला लावली. एवढी सगळी यंत्रणा कामाला लावूनही अखेर अमितभाईंच्या चपला काही हाती लागल्या नाहीत. अशा दुःखद प्रसंगीही काही भाजपाईंनी त्रिवेंद्रसिंग रावत कसे कुचकामी मुख्यमंत्री आहेत, साध्या चपलांचाही शोध घेऊ शकत नाहीत, अशी कुजबूज अमितभाईंच्या कानात केलीच. एकूणच सगळ्य़ा प्रसंगामुळे ‘अमितभाई को गुस्सा  क्यों आया’ हे नव्याने सांगायला नको.

 

बिप्ल देवांचे ‘बदक’

देशातील जनता महागाई, बेरोजगारीमुळे त्राहीमाम झाली आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे तर जनतेच्या जखमेवर मीठच चोळले गेले. त्यातून जनतेला रिलीफ देण्यासाठी म्हणा किंवा मूळ मुद्द्यावरून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी भाजपचे नेते एखाद्या ‘कॉमेडी शो’ ला लाजवतील अशा पद्धतीचे विनोद करून सध्या जनतेचे फुकटात मनोरंजन करत आहेत. टीव्हीवर सध्या दर्जेदार विनोदी कार्यक्रमांची वाणवा असली तरी भाजपचे जबाबदार नेते ही उणीव भरून काढत आहेत. अर्थात त्यात सर्वात वरचा नंबर लागतो तो त्रिपुराचे तरुण मुख्यमंत्री बिप्लव देव यांचा. देव यांच्या सोबतीला हरियाणाचे तितकेच वोनोदी मुख्यमंत्री मनोहर खट्टर आणि केंद्रातले मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग असल्याने हे ‘त्रिकुट’ देशभरात हास्याची कारंजे उडवत असते. यापैकी खट्टरांना मनरेगाच्या खड्ड्यातून सरस्वती प्रकट झाल्याचा साक्षात्कार झाला होता. तर डार्विन, न्यूटनसह सर्वच शास्त्रज्ञांना खोटे पाडून सत्यपालसिंग मोदींच्या ‘न्यू इंडिया’तील थोर शास्त्रज्ञ बनले आहेत. महाभारत काळातही इंटरनेट होते, असा भन्नाट शोध लावून देशभरात कीर्ती मिळविलेल्या बिप्लव यांनी मुख्यमंत्रीपदाच्या बिझी शेड्युलमधून आणखी एक शोध लावला आहे. तो म्हणजे बदकांच्या पाण्यातील वावरासंदर्भात. वनस्पती आणि झाडांमुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते हे आजवरचे शास्त्रीय वास्तव. मात्र, हे वास्तव मानतील तर ते बिप्लव कसले? बिप्लव यांनी बदक पाण्यात पोहत असताना ऑक्सिजनची पातळी कमालीची उंचावते, असे छातीठोकपणे ठोकून दिले आहे. काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील गणेशसिंग नावाच्या खासदाराचे पीए असलेल्या बिप्लव यांचे त्यावेळचेही किस्से मशहूर आहेत. तोच टेम्पो त्यांनी नशिबाने मुख्यमंत्री पद मिळाल्यावरही कायम ठेवला आहे. एकूणच आपल्या ‘कंट्रोल’मधला माणूस मुख्यमंत्री असावा, या भाजप नेतृत्वाच्या धोरणामुळे ज्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केलेली नसेल अशी खट्टर, बिप्लव देवसारखी माणसे मुख्यमंत्री पदासारख्या जबाबदारीच्या पदांवर बसली आहेत. आता अशा ‘महनीय’ व्यक्तींना ‘सहन’ करण्याशिवाय त्या राज्याच्या जनतेसमोर पर्याय तरी काय आहे?

nileshkumarkulkarni@gmail.com