दिल्ली डायरी : बिहारमधील महागठबंधनचे साथी हाथ बढाना!

254
amit-shah

>> नीलेश कुलकर्णी   

राजकारणातील जोड्या ‘ब्रेक’ करण्यासाठी कालपर्यंत भारतीय जनता पक्ष पटाईत होता, मात्र पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेस ‘जोडीब्रेकर्स’च्या भूमिकेत वावरताना दिसत आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या राष्ट्रीय समता पार्टीच्या उपेंद्र कुशवाह यांना काँग्रेसने महागठबंधनच्या बंधनात गुंतवण्यात यश मिळवले आहे. लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवानदेखील एनडीएतून बाहेर पडतील अशी चिन्हे होती. मात्र त्यांना रोखण्यात भाजप कसाबसा यशस्वी झाला आहे. त्यामुळे बिहारमधील एनडीएचे तारू आता तरी थोडेफार स्थिर दिसत असले तरी बिहारमध्ये महागठबंधनचे ‘साथी हाथ बढाना’ जोरात सुरू आहे आणि त्याचा फटका एनडीएला बसू शकतो. 

भाजपप्रणीत ‘एनडीए’शी फारकत घेऊन राष्ट्रीय समता पार्टीच्या कुशवाह यांनी काँग्रेसप्रणीत महागठबंधनशी सोयरिक केली. त्यांच्यापाठोपाठ ज्यांचा ‘पॉलिटिकल स्मेलसेन्स’ जबरदस्त मानला जातो ते लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान हेदेखील ‘एनडीए’ला टाटा करतील असे चित्र होते. मात्र भाजपने माघार घेत बिहार विधानसभेच्या जागावाटपात पासवान यांचा सात जागांचा हट्ट पूर्ण केला. या फार्म्युल्यानुसार पासवान यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असून विधानसभेच्या सहा जागा त्यांच्या पक्षाला सोडण्यात आल्या आहेत. पासवान ज्या बाजूला सरकतात त्या दिशेने सत्तेचा लंबक झुकतो असा आजवरचा इतिहास आहे. त्यांचा हा ‘पायगुण’ माहीत असल्यामुळेच साडेचार वर्षे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना त्यांच्याशी अडीच तास चर्चा करावी लागली. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या महागठबंधनच्या प्रयोगाला मायावती आणि अखिलेश यादव या आत्या-भाच्याने ब्रेक लावला. त्यामुळे राहुल गांधी बॅकफूटवर गेले होते. मात्र उत्तर प्रदेशमध्ये जे गमावले ते राहुल यांनी बिहारमध्ये कमावले अशी परिस्थिती आहे. काँग्रेस आणि कुशवाह यांच्या जोडीला शरद यादव, तेजस्वी यादव, जीतनराम मांझी, पप्पू व रंजिता यादव हे दांपत्य आणि कम्युनिस्टांचे नवतारणहार कन्हैया कुमार यांचे ‘साथी हाथ बढाना’ सुरू आहे. त्यांनी जर हे गाणे एकसुरात म्हटले तर मोदी व नितीशकुमार या सुशासनबाबूंना ते महागात पडण्याची शक्यता आहे. बिहारमधील ‘मुस्लिम यादव’ (मायी) समीकरण लक्षात घेता लालू यादवांचा तुरुंगवास हा बिहारात तरी यादवांमध्ये सहानुभूतीच्या रूपाने उसळून येऊ शकतो. जोडीला कुशवाह यांच्या समाजाची व्होट बँक, कम्युनिस्टांचे केडर असा ताळमेळ जुळून आला तर 40 पैकी बहुतांश जागा महागठबंधनच्या पदरात पडू शकतात. बिहारमधील नितीशकुमारांच्या कामगिरीवर जनता नाराज नसली  आणि लालू राजवटीबद्दल आजही तेथे रोष असला तरी उत्तर प्रदेश -बिहारमध्ये जातीपातीवर निवडणुका लढविल्या जातात. विकासाचे राजकारण तिथे कोसीच्या प्रवाहात वाहून जाते हा इतिहास आहे. त्यामुळे सामाजिक समीकरणाची कसरत पाळत त्यावर मात करणे हे  नितीशकुमारांसाठी मोठे अग्निदिव्य असेल.  

अमितभाई को गुस्सा क्यों आता है?

पाच राज्यांतील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा हे वरवर शांत वाटत असले तरी आतून भयंकर अस्वस्थ आहेत. त्यात भाजपाध्यक्षांचा पक्षातील दरारा वेगळाच. पाच राज्यांच्या निकालानंतर अमितभाईंना कडाक्याच्या थंडीत संसदेतील भाजप कार्यालयात एसी लावून पराभवाचे ‘चिंतन’ करावे लागले. यावेळी अमित शहा यांनी धारण केलेल्या रुद्रावतारामुळे ‘अमितभाई को गुस्सा क्यों आता है?’ असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपचे सरचिटणीस कैलाश विजय वर्गीस यांचा मुलगा इंदूरमधून निवडणूक लढवत होता. त्यासाठी कैलाशरावांनी सगळी ताकद पणाला लावली. दोन महिने इंदुरात मुक्काम ठोकला. मुलगा कसाबसा जिंकला, मात्र कैलाशराव अमितभाईंचे पराभवाबद्दल सांत्वन करायला गेले आणि फसले, ‘कैलाशजी आप बंगाल के प्रभारी हो या इंदूर के, बंगाल जाकर आपको कितने महिने हो गये’ असा खडा सवाल केल्यावर कैलाश यांच्या चेहर्‍यावरचे रंग उडाले. दुसरे सरचिटणीस मुरलीधरराव यांना ‘केरळ हे हिंदुस्थानात आहे हे लक्षात आहे ना’ अशा शब्दांत अमित शहा यांनी सुनावले तर भाजपातील एका ‘विद्वान’ राज्यसभा खासदाराला तर शहा यांनी ‘आम्ही तुमच्यासारख्या कारकुनांना मोठे केले हीच चूक झाली’ असे खडसावले.  

भाजप खासदार ‘हलू बोलू’ लागले…

पाच राज्यांमधील भाजपच्या पराभवाने मोदी-शहा जोडी चिंताक्रांत असली तरी भाजप खासदारांची अवस्था ‘मन में लड्डू फूट रहे है’ अशी झाली आहे. साडेचार वर्षे हाताची घडी तोंडावर बोट अशी घालवल्यानंतर आता कुठे भाजप खासदारांना थोडी तरतरी आली आहे. संसदेत होणारी भाजपच्या खासदारांची बैठक म्हणजे एरवी एकप्रकारचा क्लासच असतो. दोन माणसे बोलणार, बाकीच्यांनी ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ ठेवून ऐकायचे. क्लासमध्ये विद्यार्थी प्रश्न तरी विचारू शकतात, इथे ती पण मुभा नाही. मात्र नुकत्याच झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीला मोदी-शहा पहिल्यांदाच मुंबई दौर्‍यावर असल्याने गैरहजर होते. त्यांच्या अनुपस्थितीत राजनाथ नावाचे सर क्लास घेणार म्हटल्यावर मात्र भाजप खासदारांनी वर्ग डोक्यावर घेतला. ‘राममंदिर तुम्ही खरेच बांधणार आहात का आणि कधी बांधणार हे सांगा, लोक आम्हाला रस्त्यावर फिरू देत नाहीत. शिवसेनेने राममंदिराचा मुद्दा हाती घेतल्यानंतर आम्हाला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे’ असे खासदारांनी भंडावून सोडल्यानंतर राजनाथ सरांनी ‘संयम बाळगा, राममंदिर वेळ आली की होईल’ असे म्हणत सुटका करून घेतली. त्यानंतर संसदेत उत्तर प्रदेशचे दोन भाजप खासदार भेटले. त्यांची प्रतिक्रिया मार्मिक होती. ‘शिवसेना ने राममंदिर के मुद्दे को बढावा दिया है. बहोत अच्छी बात है. हम कम से कम राम के नाम पर तो मुंह खोल सकते है. चार साल तक मुंह पें ताला था, अब खुल गया. राममंदिर का कुछ करेंगे तोही चुनाव लडेंगे. नहीं तो सांसद बन के भी क्या फायदा है? आप देख ही रहै है…’ पाच राज्यांतील पराभवानंतर भाजप खासदार आता ‘हलू बोलू’ लागले आहेत. खासदारकी नाही मिळाली तरी हरकत नाही, पण असला जुलूम नको, अशी त्यांची सध्याची मानसिकता आहे.  

 [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या