
>> नीलेश कुलकर्णी
ज्या भाजपने झारखंडचे मुख्यमंत्री असताना हेमंत सोरेन यांना ईडीकरवी तुरुंगात डांबले तेच हेमंत नजीकच्या भविष्यात भाजपचा ‘तीळगूळ’ खाणार का, असा सवाल सध्या राजधानीत विचारला जात आहे. हल्ली देशात सत्तेची समीकरणे उद्योगपती ठरवतात. त्यात हेमंत यांनी नुकतीच अहमदाबादची वारी केल्याने झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि भाजप यांच्यात ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे होणार या चर्चांनी जोर पकडला आहे.
‘खरमास’ला दिल्लीच्या राजकारणात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. खरमास हे अशुभ मानले जाते. संक्रातीनंतरचे उत्तरायण हे शुभ मानले जाते. खरमास आटोपल्यावर संक्रातीनंतर हेमंत सोरेन व भाजप एकमेकांना सत्तेच्या आघाडीचा तीळगूळ भरवतील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अर्थात ही चर्चा पहिल्यांदाच होत नाहीये. भाजपचा दणदणीत पराभव करून इंडिया आघाडीतर्फे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर हेमंत सोरेन हे सातत्याने दिल्लीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. दीड-दोन महिन्यांपूर्वी कोणत्याही शासकीय अजेंडय़ाशिवाय हेमंत हे सलग पाच दिवस सपत्नीक दिल्लीत होते. त्या वेळी भाजपसोबतच्या संभाव्य आघाडीसोबतची बोलणी झाल्याचे मानले गेले. मात्र सासरेबुवा आजारी असल्यामुळे आपण दिल्लीत होतो, असे हास्यास्पद स्पष्टीकरण हेमंत यांनी दिले. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री असलेली व्यक्ती सासऱयांच्या आजारपणासाठी पाच दिवस दिल्लीत ठाण मांडून राज्याची सेवा करण्याऐवजी सासरेबुवांची सेवा करत बसते हे कोणालाही पटणारे नाही.
हेमंत सोरेन यांनी गेल्या आठवडय़ात पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतींची अहमदाबादला भेट घेतली. भले सामन्यांसाठी तिकडे गेल्याची बतावणी त्यांनी केली. मात्र त्यामुळे हेमंत हे भाजपच्या एनडीएमध्ये सामील होतील, अशी अटकळ बांधली जात आहे. भाजपसोबत जाण्याइतपत हेमंत हे हतबल आहेत किंवा त्यांना हतबल करण्यात आले आहे. झारखंडच्या निवडणुकीत सोरेन यांची ‘मईया सन्मान’ योजना गेमचेंजर ठरली. हेमंत भाजपचा दारुण पराभव करून पुन्हा मुख्यमंत्री बनले, मात्र आता हीच योजना हेमंत यांच्यासाठी ‘गले की हड्डी’ बनली आहे. त्याची अंमलबजावणी करता करता त्यांच्या नाकीनऊ येत आहे. विरोधी पक्षाचे सरकार असल्यामुळे केंद्रातील सरकारने मदतीचा हात आखडता घेतला आहे. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमधील चौकशांमुळेही हेमंत हैराण आहेत. त्यातच बिहारच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी झारखंड मुक्ती मोर्चाला इंडिया आघाडीत स्थान दिले नाही. एकही जागा या पक्षासाठी सोडली नाही. त्याचाही राग हेमंत यांच्या मनात आहे. अशा स्थितीत भाजपसोबत गेल्यास मुख्यमंत्री पदही अबाधित राहील, शिवाय पाठीमागे लागलेला चौकशांचा भुंगाही थांबेल, असा निर्णय घेण्यापर्यंत हेमंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. या बदल्यात हेमंत यांच्या पत्नीलाही दिल्लीच्या राजकारणात स्थान दिले जाईल, असे सांगितले जात आहे. जल, जंगल, माटी और मनुष्य यांच्यासाठी आयुष्यभर संघर्ष केलेले संघर्षपुरुष शिबू सोरेन यांचे चिरंजीव भाजपमध्ये गेलेच तर इंडिया आघाडीसाठी बंगालच्या निवडणुकीपूर्वीचा तो मोठा धक्का असेल.
ये रिश्ता क्या कहलाता है!
चीनसोबतचे आपले संबंध तणावाचे असताना दिल्लीत भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांसोबत गुफ्तगू केल्याने खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी काँगेसच्या नेत्यांनी चीनच्या राजदूतासोबत चर्चा केली होती तसेच कम्युनिस्ट नेत्यांची भेट घेतली होती. त्या वेळी भाजपच्या भक्तमंडळींनी काँगेसवर टीका केली होती. तसेच ‘काँगेस का हात देश के दुश्मनों के साथ’ असे नरेटिव्ह सेट केले होते. मात्र आता चीनच्या सीपीसी पक्षाच्या नेत्यांसोबत भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग व इतर भाजप नेत्यांनी मनोसक्त भोजनगप्पा मारल्या. इतकेच नाही तर, प्रखर हिंदुत्ववादी असा दावा करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्रमांक दोनचे नेते दत्तात्रय होसबले हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाल्यापासून चीनने आपल्या कुरापती वाढविल्या आहेत. चीनचा इतिहास हा दगाफटक्यांचा आहे. चीनसंदर्भात नेहरूंच्या नावाने खडे फोडणाऱ्यांनी चीनसोबत काय गुफ्तगू केले हा औत्सुक्याचा विषय आहे. चीनच्या सीपीएम नेत्यासोबतचे भाजपा नेत्यांचे फोटो पाहून त्यांचेच भक्तगण सध्या खवळले आहेत. संघाच्या नेत्यांनी आपले फोटोच सार्वजनिक केले नाहीत. अर्थात ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ याचे देशाला उत्तर मिळायला हवे!
‘त्यागी माहात्म्य’ संपले!
संयुक्त जनता दलातले दिग्गज नेते व नितीशकुमार यांचे अनेक वर्षे ‘आंखो का तारा’ राहिलेल्या के. सी. त्यागी यांना त्यांच्याच पक्षाने दूर केले आहे. त्यागी 50 वर्षांपासून दिल्लीच्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यांचा प्रदीर्घ अनुभव नितीशबाबूंशी असलेली जवळीक लक्षात घेऊन पक्षाने त्यांची औपचारिक हकालपट्टी केलेली नाही. मात्र तसे सुतोवाच केले आहे. त्यागी यांनी पक्षाच्या भूमिकेविरुद्ध काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. मात्र त्यात फारसे तथ्य दिसत नाही. नितीशकुमार यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी त्यागी यांनी केली होती. मात्र भाजपच्या सांगण्यावरून त्यागींनी ही मागणी केली व त्यांचा नितीशकुमारांना रिटायर करण्याचा ‘प्लॅन’ आहे, अशी कंडी पिकवली गेली. पण विरोधकांच्या या दाव्यात तथ्य नाही. बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमानला आयपीएल खेळू द्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. बांगलादेशने लिटन दास नावाच्या हिंदू खेळाडूला क्रिकेट कॅप्टन बनवले आहे, असा त्यागींचा बचाव होता आणि तो नितीशबाबूंच्या सेक्युलर स्टॅंण्डशी मिळताजुळताही होता. तरीही त्यावरून त्यागींना घेरण्यात आले. नितीशबाबूंची तब्येत सध्या तोळामासा आहे. त्याचा फायदा घेत के. सी. त्यागी पुन्हा राज्यसभेवर जाऊ नयेत यासाठी त्यांचा अशा पद्धतीने ‘कार्यक्रम’ करण्यात आला असे बोलले जात आहे.































































