
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
गेल्या 19 वर्षांत 10 मुख्यमंत्री पाहिलेल्या झारखंडची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यादृष्टीने सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह विरोधी पक्षांतही हालचाली सुरू झाल्या आहेत. अर्थात सध्या तेथील भाजपचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यावर रचल्या गेलेल्या ‘रघुबरचालिसा’मुळे खळबळ उडाली आहे. या ‘रघुबरचालिसा’वर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे हा खटाटोप मुख्यमंत्री दास यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहे. पुन्हा हा ‘रघुबरचालिसा’ झारखंडच्या जनतेला रुचेल का? हा प्रश्नही आहेच.
गेल्या 19 वर्षांत पाच वर्षे पूर्णवेळ टिकलेले मुख्यमंत्री ही एकमेव उपलब्धी सोडता झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या गाठीशी जनतेला पुन्हा कौल मागण्यासारखी इतर कोणती पुंजी नाही. 2014 मध्ये झारखंडसारख्या आदिवासींचे प्राबल्य असलेल्या राज्यात बिगर आदिवासी मुख्यमंत्री देण्याचे धाडस भाजप नेतृत्वाने दाखवले. ते कौतुकास्पद असले तरी त्यातून काय हशील झाले? हा प्रश्नच आहे. त्यामुळे झारखंडमध्ये आता विधानसभा निवडणुकीत काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. राजकीय आणि विकासाभिमुख कामगिरीपेक्षा कमकुवत विरोधक हीच भाजपची अलीकडच्या काळातील पुंजी ठरली आहे. झारखंडमध्येही रघुबर दास यांचे सरकार उलथवून टाकण्याची सुवर्णसंधी असताना काँगेसचे सुबोधकांत सहाय स्वतःच्याच पक्षावर चिडले आहेत, तर बाबुलाल मरांडींनी झारखंड मुक्ती मोर्चाप्रणीत महागठबंधनमध्ये सामील होण्यास खळखळ सुरू केली आहे. विरोधकांची ही बेदिली कायम राहिली तर ‘रघुबरचालिसा’ वाचण्यावाचून झारखंडच्या जनतेला पर्याय राहणार नाही.
झारखंड राज्य कशाच्या जीवावर जिंकायचे? असा यक्षप्रश्न भाजप नेतृत्वापुढे आहे. राममंदिराचा मुद्दा भाजपला झारखंड जिंकून देतो का? हेही यानिमित्ताने पाहावे लागेल. मात्र मुद्दय़ांची आणि विकासकामांची वानवा असल्याने बहुतांश विद्यमान आमदारांचे तिकीट कापून ‘ऍण्टीइन्कमबन्सी’ची धार बोथट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत 37 जागा जिंकून 31.8 टक्के मते मिळविणाऱया भाजपला एजेएसयू या पक्षाच्या टेकूमुळे कशीबशी सत्ता मिळाली होती. यावेळी सुरुवातीपासूनच भाजप आणि एजेएसयू पक्षांत खटके उडत आहेत. त्यामुळे भाजपचे गलबत निवडणुकीपूर्वीच हेलकावे खात आहे. मात्र तिकडे विरोधी पक्षांत भाजपपेक्षाही आनंदी आनंद आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या छत्राखाली काँगेस, माकपा आणि बाबुलाल मरांडींचा झारखंड विकास मोर्चा एकत्र यावेत आणि धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र हे प्रयत्न हास्यास्पद ठरत आहेत. महागठबंधनच्या हेमंत सोरेन, बाबुलाल मरांडी आणि काँगेसचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर उरांव या तिघांनाही एकाच वेळी मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच एकमेकांची जिरविण्याची स्पर्धा सुरू आहे. काँगेसमध्ये इतर ठिकाणी असतो तसाच संघटन पातळीवर खेळखंडोबा येथेही आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली होती आणि पोलिसांना पाचारण करावे लागले होते. आताही माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांनी प्रदेशाध्यक्ष रामेश्वर उरांव यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. विरोधकांमधली हे बेदिली रघुबर दास यांना तारण्याची शक्यता आहे. ‘रघुबरचालिसा’ रचून स्वतःचे महिमामंडन करणे झारखंडच्या जनतेला कदाचित रुचणार नाही, मात्र सध्या तरी जनतेपुढे कोणी ‘संकटमोचक’ दिसत नाही.
मोदी सरांची ‘छडी’ आणि सार्वजनिक ‘शाबासकी’!
‘ठरलेला रूट बदलून पंतप्रधान वेगळ्याच मार्गाने भाजपच्या मुख्यालयात पोहोचले’ ही बातमी जशी गाजली त्याहून अधिक मनोरंजक माहिती पक्षाच्या मुख्यालयात मोदींनी भाजप नेत्यांच्या घेतलेल्या शाळेबद्दल प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र आणि हरयाणातील निकालामुळे मोदींचा मूड ऑफ झालेला आहे. हरयाणातील सरकार हातचे जाईल म्हटल्यावर स्वतः अमित शहांनी सूत्रे हाती घेऊन अजय चौटालांची तुरुंगातून सुटका करत हरयाणातील मनोहरलाल खट्टर यांची हेलकावे खाणारी खुर्ची कशीबशी वाचवली. या दोन्ही राज्यांतील कामगिरीचा मोदींनी बंद खोलीत आढावा घेतला. आपण मोदीजींचे जुने मित्र आहोत. त्यामुळे मोदी आपल्याला काही बोलणार नाहीत अशी अटकळ बांधलेल्या मनोहरलाल खट्टर यांची मोदींनी आपल्या खास शैलीत चांगलीच कानउघाडणी केली. ‘‘खट्टरजी, आपने तो बीजेपी का पुरा सुपडा साफ किया, कितनी गलतियां की आपने?’’ अशा शब्दांत मोदींनी झापल्यानंतर खट्टर घामाघूम झाले. हरयाणाचे प्रभारी अनिल जैन, महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि सरोज पांडे यांच्यावरही मोदी चांगलेच बरसले. हा झापाझापीचा तणाव घेऊनच ही मंडळी कोअर कमिटीच्या बैठकीत अंग चोरून बसली. मात्र या बैठकीत एकदम वेगळी स्थिती होती. बंद खोलीत मोदी यांनी ज्या नेत्यांची झापाझापी केली, त्याच नेतेमंडळींच्या नेतृत्वगुणांचे कौतुक मोदी यांनी केले. अर्थात त्यामागे सार्वजनिक ठिकाणी बोलताना कार्यकर्त्यांचे मोराल ढासळू नये हा पंतप्रधानांचा हेतू असावा. या बैठकीत मोदी सरांची ‘छडी’ आणि सार्वजनिक ‘शाबासकी’ गाजली ती अशी.
‘वाणी’ प्रदूषण
बेताल बडबडू नका, पाय जमिनीवर आणि डोके ताळ्यावरच ठेवा असे पंतप्रधान महोदयांनी कित्येकदा बजावूनही भाजपचे नेते बेताल काही केल्या सोडायला तयार नाहीत. मोदी सरकारमध्ये पूर्वी मंत्री राहिलेले सत्यपालसिंग अशाच वक्तव्यांसाठी ख्यातकीर्त होते. इतके की, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा आणि डार्विनचा मानवी उक्रांतीचा सिद्धांत खोटे ठरविण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. सत्यपालांचे हे ‘वाणी प्रयोग’ लक्षात आल्यानंतर मोदींनी आपल्या दुसऱया मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिले नाही. त्यातून बेताल बडबडणाऱयांना मेसेजही दिला. मात्र भाजपचे नेते सुधारताना दिसत नाहीत. प्रदूषणामुळे दिल्लीचे रूपांतर ‘डेथ चेंबर’मध्ये झालेले असताना उत्तर प्रदेशच्या दोन भाजप नेत्यांनी जावईशोध लावला आहे. तेथील व्यापारी प्रकोष्ठाचे प्रमुख असलेल्या विनीत अग्रवाल या महाशयांनी दिल्लीतील प्रदूषणासाठी कारखाने, गहू-तांदळाचे तण जबाबदार नाही, तर पाकिस्तान किंवा चीनने मुद्दाम विषारी वायू दिल्लीत सोडला असे ‘अकलेचे तारे’ तोडले. पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यामुळेच पाकिस्तानने हे विषारी वायू सोडले असे सांगत अग्रवालांनी ‘वाणी प्रदूषण’ केले आहे. अग्रवाल यांच्या विधानाकडे डोळेझाक करावी तर दुसरीकडे सुनील भराला नावाचे राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणारे भाजपचे सद्गृहस्थ बरळले. त्यांनीही जनतेला ‘ज्ञानामृत’ पाजताना यज्ञ, हवन केल्यास इंद्रदेव खूश होतील आणि प्रदूषण दूर होईल असा तर्क मांडला आहे. ‘इंद्रा’चे माहीत नाही, पण दिल्लीतले ‘नरेंद्र’ मात्र भराला आणि अग्रवाल यांच्यावर रुष्ट होण्याचीच चिन्हे अधिक आहेत.



























































