दिल्ली डायरी : कर्नाटकातील ‘तीन तिघाडा’!

2704

>> नीलेश कुलकर्णी 

कुमारस्वामींची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेल्यानंतर तरीकर्नाटकी सत्तानाट्यसंपेल अशी भाबडी आशा बाळगणाऱ्यांचा भ्रमनिरास होत आहे. कुमारस्वामींनंतर सत्तेवर आलेल्या भाजपच्या येडियुरप्पा सरकारमध्ये आता नव्या संगीत खुर्चीचा खेळ सुरू झाला आहे. येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री बनले खरे, पण भाजपच्या हायकमांडने त्यांची गाठ तीन उपमुख्यमंत्र्यांशी बांधून सत्तेचानवा सारीपाटमांडला आहे. एकाच राज्यात तीन उपमुख्यमंत्री नेमण्याचा भाजपचा हापायलट प्रोजेक्टअसला तरी त्यामुळेतीन तिघाडा काम बिघाडाअसेच होण्याची दाट शक्यता आहे. येडियुरप्पा या तीन तिघाडाला पुरून उरतात की नामोहरम होतात ते येणारा काळच ठरवेल.

three-cm-1कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप श्रेष्ठींनी महिनाभर येडियुरप्पांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी परवानगीच दिली नाही. महिनाभर वेटिंगवर बसलेल्या येडियुरप्पांना अखेर ‘साऊथ इंडियन सिनेमा’ला साजेसे असे तीन उपमुख्यमंत्री नेमण्याची वेळ आली. थोडक्यात येडियुरप्पा फार चुळबूळ करू शकणार नाहीत याची तजवीज भाजप श्रेष्ठींनी केली आहे. वास्तविक कर्नाटकात भाजप रुजविण्याचे श्रेय येडियुरप्पांचेच! मात्र, मध्यंतरी येडियुरप्पा ‘आऊट ऑफ कंट्रोल’ झाले होते. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप झाले. त्यामुळे भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांनी येडियुरप्पांचा चौखूर उधळणारा वारू रोखत त्यांची गाठ आता तीन उपमुख्यमंत्र्यांशी बांधली आहे. एकाच राज्यात तीन उपमुख्यमंत्री नेमण्याचा भाजपचा हा ‘पायलट प्रोजेक्ट’ असला तरी त्यामुळे ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ असेच होण्याची दाट शक्यता आहे. येडियुरप्पा या तीन तिघाडाला पुरून उरतात की, नामोहरम होतात ते येणारा काळच ठरवेल.

कुमारस्वामींच्या आसनाखालचे जाजम खेचले आणि चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवले हा येडियुरप्पांचा आनंद फारच अल्पजीवी ठरल्याचे कर्नाटकात महिनाभरानंतर अस्तित्वात आलेल्या मंत्रिमंडळ रचनेवरून दिसून येत आहे. ज्यांच्याशी येडियुरप्पांचे विळ्याभोपळ्याचे सख्य होते ते बी. एल. संतोष सध्या भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस आहेत. भाजपच्या संघटनेत हे पद ‘पॉवरफूल’ मानले जाते. हे संतोष आता जुने हिशेब चुकते करण्याबरोबरच येडियुरप्पांना हिशेबात कसे ठेवता येईल यादृष्टीने डावपेच टाकत आहेत. त्यामुळेच मंत्रिमंडळाच्या रचनेबाबत चर्चा करण्यासाठी येडियुरप्पांना अमित शाह यांची अपॉइंटमेंट मिळविण्यासाठी घाम गाळावा लागला. त्यानंतर येडियुरप्पांनी दिलेली यादी फेटाळून लावत भाजप श्रेष्ठींनी आपल्या पसंतीची यादी त्यांच्या हाती दिली आणि मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दाखविला. कुमारस्वामी व कॉंग्रेसचे आमदार मुंबईहून बंगळुरूपर्यंत ‘सुरक्षित’ आणण्याची जबाबदारी पार पाडल्याची बक्षिसी म्हणून अश्वत्थ नारायण यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले तर गोविंद कराजोल यांनाही अशीच बिदागी मिळाली. अश्लील चित्रफीत पाहण्याचे आरोप झालेले लक्ष्मण सावदांही उपमुख्यमंत्री बनले आहेत. रमेश जरकिहोली यांचा उमेदवारी पात्रतेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. अन्यथा तेदेखील तिसऱ्यात चौथा म्हणत उपमुख्यमंत्री झाल्याचे चित्र कदाचित दिसले असते. गमतीचा भाग म्हणजे येडियुरप्पांच्या याच सरकारात जगदीश शेट्टर हे माजी मुख्यमंत्री तसेच के. एस. ईश्वरअप्पा व आर. अशोक या दोन माजी उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. एकंदरीतच आजी-माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची ‘मेगा भरती’ करून भाजप हायकमांडने येडियुरप्पांची कोंडी केली आहे.

आडवाणी, शाह आणि ध्वजारोहण

advani-fस्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहणाचा एक देदीप्यमान इतिहास आहे. देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर देशाला संबोधित करत असतात. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी एक अनोखा पायंडा पाडला होता. स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण पार पडल्यानंतर आडवाणी आपल्या निवासस्थानी ध्वजारोहण करायचे.

amit-shahया कार्यक्रमाला अनेक मान्यवरही उपस्थित राहायचे. गेल्या वर्षीपर्यंत आडवाणींनी या ध्वजारोहणात कधी खंड पडू दिला नाही. मात्र, यंदा प्रथमच आडवाणींच्या पृथ्वीराज रोडवरील निवासस्थानी ध्वजारोहण झाले नाही. अर्थात त्यामागचे कारण राजकीय नव्हते. आडवाणींची प्रकृती ठीक नसल्याने ते ध्वजारोहण करू शकले नाहीत. मात्र त्याच वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आडवाणींची अनुकरणीय पंरपरा पुढे नेली. शहा यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी अगदी उत्साहात ध्वजारोहण केले.

santosh-gangwar1पाच मतांचे चॅलेंज..!

देशभरातले विरोधक ईव्हीएम मशीनच्या नावाने निवडणूक निकालानंतरही बोंब मारत असतानाच आता सरकारातल्याच एका मंत्र्याने ‘‘मुझे इस बूथ पर केवल पांच व्होट कैसे मिले?’’ असा सवाल उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार हे उत्तर प्रदेशातील बरेलीचे लोकप्रिय खासदार आहे. केवळ एका निवडणुकीचा अपवाद वगळता गंगवार लोकसभेवर आठवेळा निवडून आले आहेत. अनेक स्थित्यंतरे आली तरी त्यांनी आपली बरेली शाबूत ठेवली आहे. मात्र कालीबाडी येथील बूथवर आपल्याला केवळ पाचच मते कशी काय मिळाली या चिंतेने गंगवार यांच्या लोकसभेवर निवडून येण्यावर व नव्याने मंत्री बनण्यावरही विरजण टाकले आहे. मंत्री बनूनही त्याचा आनंद गंगवारांच्या चेहऱ्यावर नाही, त्यांना चिंता आहे ती केवळ पाचच मते कशी मिळाली याची. याबाबत गंगवार यांनी कलेक्टरांना खरमरीत पत्र लिहून कालीबाडी बूथवर 290 मते अधिकृत असताना मला केवळ पाचच मते कशी काय मिळाली? अशी पृच्छा केली. मंत्र्यानेच तक्रार केल्यानंतर यंत्रणा अर्थातच कामाला लागली. त्यानंतर दोन बूथमधील मतांची मोजणी करताना गल्लत झाल्याची चूक प्रशासनाने कबूल केली. मात्र चूकभूल ‘दुरुस्त’ करण्यासाठी  प्रशासनाला घाम फुटत आहे. ही चूक ‘कबूल’ करायची तर निवडणूक आयोगाची परवानगी लागणार. निवडणूक आयोग या चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. त्यातच गंगवार यांच्या या शोधामुळे मतदानात गडबड झाल्याचा आरोप करायला विरोधकांच्या हाती नवे कोलीत मिळाले आहे ते वेगळेच. गंगवार यांनी स्वपक्षासह प्रशासन आणि निवडणूक आयोगाची चांगलीच कोंडी केली आहे. केवल पाच व्होट कैसे मिले? याचे उत्तर कदाचित गंगवार यांना मिळालेही असेल. मात्र आता निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे देताना प्रशासनाची आणि विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना भाजपची दमछाक होणार, हे नक्की.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या