कथित मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राउज एव्हेन्यू न्यायालयाकडून कुठलाही दिलासा मिळाला नाही. राउज एव्हेन्यू न्यायालयाने बुधवारी त्यांचा अंतरिम जामीन फेटाळला आहे. दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने 1 जूनचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. त्यावर बुधवारी निर्णय देण्यात आला. यासह राउज एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. 19 जूनपर्यंत कोठडी वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.
दिल्लीच्या राउज एव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी बुधवारी अरविंद केजरीवाल यांचा जामीन अर्ज फेटाळला. अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि प्रकृतीचे कारण सांगून अंतरिम जामीन वाढवण्याची विनंती केली होती. एएसजी एसव्ही राजू यांनी ईडीच्यावतीने याला विरोध केला होता. त्यावेळी ते पंजाबमध्ये प्रचार करत असताना वैद्यकीय आधारावर जामीन मागत असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.
अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली होती. 1 एप्रिल रोजी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निवडणूक प्रचारासाठी जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना त्याला 2 जून रोजी शरण येण्यास सांगितले. याआधीही अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती, त्यावर 1 जून रोजी सुनावणी होऊन निर्णय राखून ठेवण्यात आला होता.
शरणागतीची तारीख जवळ आल्यानंतर केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी केजरीवाल यांनी अंतरिम जामीन एक आठवड्यासाठी वाढ करण्याची मागणी केली होती. न्यायालयात त्यांनी तब्येतीचे कारण दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर केजरीवाल यांनी राउज एव्हेन्यू न्यायालयात धाव घेतली होती. मात्र बुधवारी राउज एव्हेन्यू न्यायालयाने ही याचिका फेटाळली.