लोकसभेची उद्या अवघड परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्लीसह सात राज्यांत मतदान होत आहे. या टप्प्यातील 59 जागांपैकी 44 जागा भाजपकडे असून त्या कायम राखण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यापुढे आहे. तर पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, यांच्यासह सपा नेते अखिलेश यादव, बसपा नेत्या मायावती यांच्या नेतृत्वाची खऱया अर्थाने कसोटी लागणार आहे.

या टप्प्यातील निवडणूक भाजपासाठी एकप्रकारे परीक्षा आहे. ज्या उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक जागा मिळवत 2014 च्या निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यात आली तेथे भाजपला पराभूत करण्यासाठी सपा-बसपा नेते आपापसातले वैर विसरून एकत्र आले आहेत. आजमगड येथून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, सुलतानपूर येथून केंद्रीय मंत्री मनेका गांधी, इलाहाबाद येथून रीटा बहुगुणा नशीब अजमावत आहेत. बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीचा भाजपला सामना करावा लागत असून भाजपा मंत्री राधामोहन सिंह निवडणुकीला सामोरे जात आहेत.

हरयाणातील 10 पैकी सात जागा गेल्या वेळी भाजपने जिंकल्या होत्या. दोन जागा भारतीय लोकदल, तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती. यंदा भाजप आणि काँग्रेस असा सामना होत आहे. हरयाणा विधानसभेची निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपल्याने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासमोर आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. या ठिकाणी मतदान होत असलेल्या सर्व आठही जागा तृणमूल काँग्रेसकडे असून त्या कायम राखण्याचे आव्हान ममता बॅनर्जी यांच्यासमोर आहे. दिल्लीतील सातही जागा सध्या भाजपकडे आहेत. भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत येथे होत असून मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वाची ही एकप्रकारे परीक्षाच ठरणार आहे.

भोपाळमध्ये अटीतटीची लढत

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ मतदारसंघातील लढत अटीतटीची होणार आहे. काँग्रेसनेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांची लढत भाजप उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वा प्रज्ञासिंग यांच्याशी होणार आहे. गुणा मतदारसंघात काँग्रेसनेते ज्योतिरादित्य सिंदिया यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सहाव्या टप्प्यात बिहार (8), हरयाणा (10), झारखंड (4), मध्य प्रदेश (8), उत्तर प्रदेश (14), पश्चिम बंगाल (8) आणि दिल्लीतील 7 अशा 59 मतदारसंघांमध्ये रकिकारी मतदान होत आहे.