मुडीजने हिंदुस्थानला दिला निगेटिव्ह दर्जा

906

देशात मंदीचे वातावरण असताना हिंदुस्थानला आणखी एक मोठा झटका बसला आहे. ‘मुडीज’ या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सेवा संस्थेने हिंदुस्थानचा स्थिर दर्जा काढून घेतला आहे. इतकेच नाही तर हिंदुस्थानला दिलेले रेटिंग घटवून निगेटिव्ह दर्जा दिला आहे. हिंदुस्थानात आलेली आर्थिक मंदी दूर करण्यात सरकार अयशस्वी ठरले असून यापूर्वीच्या तुलनेत हिंदुस्थानचा आर्थिक वृद्धीचा आणि विकासदर धीमाच राहणार असल्याचेही ‘मुडीज’ने म्हटले आहे.

कॉर्पोरेट करात कपात आणि जीडीपी अर्थात आर्थिक विकास दरवाढीचा मंदावलेला वेग पाहता मार्च 2020 पर्यंत संपणाऱया आर्थिक वर्षादरम्यान अर्थसंकल्पीय तूट 3.7 टक्के इतकी राहू शकते असा ‘मुडीज’चा अंदाज आहे. याआधी हे लक्ष्य 3.3 टक्के इतके ठेवण्यात आले होते. ऑक्टोबर 2019 मध्ये ‘मुडीज’ने 2019-20 मध्ये आर्थिक विकास दराचा अंदाज घटवून 5.8 टक्के इतका करण्यात आला होता. यापूर्वी ‘मूडीज’ने  जीडीपीचा दर 6.2 टक्के अंदाज धरला होता.

यापूर्वीच्या तुलनेत अर्थव्यवस्थेची गती संथ राहाणार

यापूर्वीच्या तुलनेत आता अर्थव्यवस्थेची गती संथ राहाणार असल्याचे ‘मुडीज’ने म्हटले आहे. तसेच इथून पुढेही संथगतीनेच अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल असेही सांगण्यात आले आहे. सरकारने आर्थिक विकास दरवाढीसाठी धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे होते, परंतु तसे निर्णय घेतले गेले नाहीत. हिंदुस्थानवर असलेला कर्जाचा बोझा भविष्यात आणखी वाढण्याची शक्यताही ‘मुडीज’ने व्यक्त केली आहे. ग्रामीण भागात निर्माण झालेले आर्थिक संकट, रोजगाराच्या घटलेल्या संधी, बिगरवित्तीय कंपन्यांवरील संकट या कारणांमुळे हिंदुस्थानचा आर्थिक विकास दर घटल्याचे ‘मुडीज’ने म्हटले आहे.

हिंदुस्थानपुढे ही आर्थिक संकटे

हिंदुस्थानातील उद्योगांमधील गुंतवणूक वाढण्याची शक्यता कमी झाली आहे.

एप्रिल ते जून या तिमाहीत हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेत 5.0 टक्क्यांनी वाढ झाली. हा दर 2013 नंतरचा सर्वात कमी दर होता.

रिझर्व्ह बँकेने व्याजदरात घट केली. सरकारने कॉर्पोरेट करात कपात करण्यासाठी मोठी पावले उचलली, परंतु सध्याची परिस्थिती पाहता आणि आर्थिक मंदीचे वातावरण पाहता आर्थिक विकासाच्या दरात घट झाली.

सरकार काय म्हणाले?

हिंदुस्थानची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत आहे. सरकारने अलीकडेच घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे उद्योगांमधील गुंतवणूक आणखी वाढेल असे अर्थ मंत्रालयाने म्हणाले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हिंदुस्थानचा आर्थिक वृद्धीचा दर 6.2 टक्के इतका राहील असा अंदाज व्यक्त केला होता.

विकास दर घटणार असल्याच्या ‘मुडीज’च्या अंदाजामुळे केंद्राचा देशाला 50 खरब अर्थव्यवस्थेपर्यंत नेण्याचा प्रयत्न फसणार आहे.

सध्या अनेक क्षेत्रांमधील उत्पादन जवळपास घटले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

रेटिंग कसे ठरते

आंतरराष्ट्रीय संस्था देशावर असलेले कर्ज फेडण्याची संबंधित देशाची क्षमता आहे की नाही याची पडताळणी करते. त्यासाठी आर्थिक, बाजार आणि राजकीय जोखमी इत्यादी गोष्टी तपासून पाहतात. याच्या आधारावर संबंधित देशाची अर्थव्यवस्था किती वाढू शकते. विकास दर किती राहील इत्यादींचा अंदाज बांधला जातो.

 

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या