रईसजाद्याच्या ‘रील’चा नाद साहिलच्या जीवावर बेतला; एकुलत्या एक मुलाचा अपघातात मृत्यू, आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी माझ्या मुलाला 23 वर्ष एकटीने लहानाचे मोठे केले. तो माझा एकुलता एक आधार होता. पण काही सेकंदांची रील बनवण्यासाठी घरून निघालेल्या एका रईसजाद्याने माझ्या मुलाचा जीव घेतला. आज तो आरोपी जामिनावर बाहेर फिरतोय आणि मी मात्र माझ्या पोटच्या गोळ्यासाठी न्यायाची भीक मागतेय. हा आक्रोश आहे एका सिंगल मदरचे. दिल्लीत 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातामध्ये तिचा एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दिल्लीतील द्वारका भागामध्ये 3 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी बाराच्या सुमरास लाल बहादूर शास्त्री कॉलेज जवळ भीषण अपघात झाला. एका सुसाट स्कॉर्पिओने दुचाकी आणि टॅक्सीला उडवले. या अपघातामध्ये दुचाकीस्वार साहिल धनेश्रा (वय – 23) याचा जागीच मृत्यू झाला. तर टॅक्सी चालक अजित सिंह गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

पोलीस तपासामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. स्कॉर्पिओ चालवणारा मुलगा केवळ 17 वर्षांचा अल्पवयीन होता. त्याच्याकडे ना ड्रायव्हिंग लायसन्स होते, ना गाडी चालवण्याचं पुरेसे ज्ञान. केवळ सोशल मीडियावर स्टंटबाजीचे व्हिडिओ आणि ‘फन रील’ अपलोड करण्याच्या नादात तो ही महागडी गाडी रस्त्यावर सुसाट धावत होता. त्याचा रील बनवण्याचा छंद साहिलच्या मृत्यूचे कारण ठरला.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जुवेनाईल जस्टिस बोर्डासमोर हजर करण्यात आले. 10 फेब्रुवारी रोजी त्याला ‘बोर्ड परीक्षेचे’ कारण देऊन अंतरिम जामीन मंजूर झाला. ही बाब समोर येताच साहिलच्या आईने एक व्हिडीओ शेअर करत माझ्या मुलाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. ज्याने माझ्या मुलाला मारले, तो परीक्षेचे निमित्त सांगून बाहेर फिरतोय. माझ्या मुलाचे भविष्य तर कायमचं संपले, मग त्याला हा अधिकार कुणी दिला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दुपारी दीडच्या सुमारास मला पोलिसांचा फोन आला. आर-15 दुचाकीचा अपघात झाला होता आणि त्यावरील मुलगा जागीच मृत्यू पावल्याचे त्यांनी मला सांगितले. मी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिथे माझा मुलगा रस्त्यावर पडला होता. त्याच्या स्पोर्टस बाईकचे तीन तुकडे झाले होते. मला मदत मिळण्यासही उशिर झाला. त्यानंतर साहिलला दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मी त्याला 23 वर्षे एकट्याने वाढवले. इथली परिस्थिती पाहून मला नेहमीच असे वाटत होते की तो या देशात राहू नये, असा आक्रोश साहिलच्या आईने केला.

माझा मुलगा ऑफिसला जात होता आणि स्कॉर्पिओ चालक खूप वेगाने गाडी दामटत होता. त्याच्या बाजूला त्याची बहीण बसली होती आणि ती रील शूट करत होती. त्यांची गाडी उलट्या बाजूने आली आणि माझ्या मुलाच्या दुचाकीला धडकली, त्यानंतर स्कॉर्पिओने रस्त्याच्या कडेला उभ्या टॅक्सीला उडवले, असेही साहिलची आई म्हणाली. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.