शाळांना द्यावी धुक्याची सुट्टी, दिल्लीतील 74 टक्के पालकांची ‘स्मोग ब्रेक’ इच्छा

दिल्लीत नोव्हेंबर महिन्यात मोठय़ा प्रमाणात धुके पसरते. दिल्लीत आधीच मोठय़ा प्रमाणात प्रदूषण असल्याने धुक्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. हे लक्षात घेता दरवर्षी साधारणपणे 1 ते 20 नोव्हेंबरदरम्यान शाळांना सुट्टी मिळावी, अशी दिल्ली-एनसीआर येथील पालकांची इच्छा आहे. यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीतून भरून काढावे, असेही पालकांना वाटत आहे. एका ऑनलाइन सर्व्हेतून ही ‘स्मोग ब्रेक’ ची इच्छा पालकांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात लोकल सर्कल्स या वेबसाईटवर ऑनलाइन सर्व्हे घेतला. दिल्ली, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा आणि गुरगाव येथील 10 हजार पालकांनी सहभाग नोंदवला. त्यातील 70 टक्के पालकांनी धुक्याच्या काळात शाळांना सुट्टी देण्याची मागणी केली. धुक्यामुळे हवेचा दर्जा खराब असतो. त्यामुळे शाळांना सुट्टी दिली पाहिजे, असे पालकांचे म्हणणे आहे.

दिल्लीतील प्रदूषणाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन दिल्ली आणि एनसीआरमधील शाळांना 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी सुट्टी दिली होती. त्याआधी सरकारने शाळा आणि कॉलेज 5 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बालदिनाचे कार्यक्रम रद्द करावे लागले होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि काही पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. दिल्ली सरकारने हा निर्णय सार्वजनिक आरोग्यावर ओढवलेल्या आणीबाणीच्या अवस्थेमुळे घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर प्रदूषण (प्रतिबंध आणि नियंत्रण) प्राधिकरणाने दिल्ली- एनसीआरमधील हॉट मिक्स प्लांटस् आणि स्टेन क्रशरमधील बंदी 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या