उदय भानू चिब आणि इतर कार्यकर्त्यांना झालेली अटक ही हुकूमशाही प्रवृत्ती आणि भ्याडपणाची साक्ष; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्लीत प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे आयोजित जागतिक एआय समिटमध्ये आंदोलन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. या अटकेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत आपल्या कार्यकर्त्यांचे समर्थन केले आहे. राहुल गांधी यांनी पोस्ट केले की, “शांततापूर्ण निषेध हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. तो आपल्या रक्तात आहे आणि प्रत्येक हिंदुस्थानीचा तो लोकशाही अधिकार आहे. ‘समस्याग्रस्त पंतप्रधान’ विरुद्ध देशाच्या हितासाठी निर्भयपणे बोलणाऱ्या माझ्या युथ काँग्रेस कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे. हे सत्य देशासमोर आणल्याबद्दल युथ काँग्रेस अध्यक्ष उदय भानू चिब आणि इतर सदस्यांना झालेली अटक ही हुकूमशाही प्रवृत्ती आणि भ्याडपणाची साक्ष आहे. काँग्रेस पक्ष आणि मी आमच्या युथ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. सत्याचा आरसा सत्तेसमोर धरणे हा गुन्हा नाही, तर देशभक्ती आहे. घाबरू नका – सत्य आणि संविधान आपल्यासोबत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त करत त्यांची पाठराखण केली आहे. शिवाय राहुल गांधी यांनी हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा करार देशाच्या हिताशी तडजोड करणारा असून यामुळे हिंदुस्थानी शेतकरी आणि कापड उद्योगाचे मोठे नुकसान होईल, असा दावा त्यांनी केला. तसेच या करारामुळे हिंदुस्थानियांचा डेटा अमेरिकेच्या हाती सोपवला जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या शुक्रवारी भारत मंडपममध्ये एआय समिट सुरू असताना युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचानक ‘शर्टलेस’ होऊन घोषणाबाजी केली होती. हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार कराराचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलकांनी ऑनलाइन नोंदणीद्वारे क्यूआर कोड मिळवून सभागृहात प्रवेश मिळवला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत उदय भानू चिब यांच्यासह एकूण आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये ग्वाल्हेरमधून अटक केलेल्या तीन कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि राष्ट्रीय अखंडतेला बाधा पोहोचवण्याचे दावे करणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.