दिल्लीत धावत्या ट्रेनमध्ये आग; ताज एक्स्प्रेसचे दोन डबे जळाले, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही

दिल्लीत एक मोठा रेल्वे अपघात झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकं थोडक्यात बचावले. दिल्लीतील सरिता विहारमध्ये सोमवारी ताज एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांना आग लागली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तुघलकाबाद-ओखला दरम्यान हा अपघात झाला. ताज एक्सप्रेसच्या दोन डब्यांना भीषण आग लागली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे उत्तर रेल्वेचे सीपीआरओ यांनी सांगितले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. ट्रेनच्या डब्यांना आग कशी लागली याबाबत अद्याप काही कळलेले नाही.

मिळालेल्य़ा माहितीनुसार, पहाटे 4.41 वाजता ट्रेनमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर दिसले की, ताज एक्स्प्रेस ट्रेनच्या तीन डब्यांना भीषण आग लागली होती. आग लागल्याची सूचना मिळाल्यानंतर खबरदारी म्हणून ट्रेनला थांबवण्यात आले. एवढेच नाही तर रेल्वे कर्मचाऱ्यांनी जळत्या ट्रेनचा उरलेला भाग सामानाच्या डब्यापासून वेगळे केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. प्रवासी इतर डब्यांमध्ये गेल्याने आणि खाली उतरल्याने कोणीही जखमी झाले नाही.

डीसीपी रेल्वेने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, एकूण सहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत किंवा नुकसान झाले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रेल्वेच्या डब्यांमधून प्रचंड ज्वाळा उठत असल्याचे  दिसत आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, 2280 ताज एक्सप्रेस ट्रेन ओखला-तुघलकाबाद ब्लॉक विभागात पोहोचताच तिच्या चार डब्यांना भीषण आग लागली. या घटनेचा तपास सुरू असून पुढील कारवाई रेल्वेकडून करण्यात येत आहे.