
दिल्लीहून कॅनडातील व्हँकुव्हरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी तांत्रिक बिघाडामुळे अर्ध्यातूनच माघारी फिरावे लागले. हे विमान चीनच्या हवाई क्षेत्रात पोहोचले असताना हा बिघाड लक्षात आला, त्यानंतर वैमानिकाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून विमान दिल्लीच्या दिशेने वळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे AI 185 हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरून व्हँकुव्हरसाठी झेपावले होते. विमान आपल्या नियोजित मार्गावर असताना आणि चीनच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्यामध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने पुढे जाण्याऐवजी दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला.
चीनच्या हवाई क्षेत्रातून यू-टर्न घेतल्यानंतर हे विमान दिल्लीत सुखरूप उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. तांत्रिक बिघाड नेमका काय होता, याची तपासणी एअर इंडियाच्या इंजिनिअर्सकडून केला जात आहे.

























































