हिंसाचाराचा भडका; मुंबईतही हायऍलर्ट, दिल्लीत एक महिना जमावबंदी!

1048

नागरिकत्व सुधारित कायद्यावरून (सीएए) विरोधक आणि समर्थकांमध्ये उडालेला भडका देशाच्या राजधानीत कायम आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा सुरू असताना सलग तिसऱ्या दिवशी उत्तर-पूर्व दिल्लीत हिंसाचाराचा आगडोंब, तुफानी दगडफेक सुरूच होती. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. हिंसाचारात मृतांची संख्या 13 वर गेली असून, 56 पोलीस आणि 130 नागरिक जखमी झाले आहेत. त्यात अनेकांची प्रकृती गंभीर आहे. प्रचंड तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर-पूर्व दिल्लीत तब्बल एक महिना कलम 144 म्हणजे जमावबंदी आदेश लागू केला आहे. हिंसाचारग्रस्त भागात पोलिसांसह निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. उत्तर-पूर्व दिल्लीतील पाच ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला असून यमुना नगरात दिसताच क्षणी गोळय़ा घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी हायऍलर्ट जारी केला आहे.

रविवारी सीएए समर्थक आणि विरोधक भिडले होते. त्यानंतर सोमवारी आगडोंब उसळला. घरे, दुकाने, पेट्रोलपंप, वाहने जाळण्यात आली. हिंसाचारात पोलीस कॉन्स्टेबल रतनलाल आणि चार नागरिकांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी उत्तर-पूर्व दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर, गोकुलपूर, भजनपूर, कर्दमपुरी, कबीरनगर, चांदबाग, दयालपूर, बाबरपूर आदी भागात दंगेखोर रस्त्यावर उतरले आणि प्रचंड दगडफेक करीत जाळपोळ सुरू केली. मंगळवारी दगडफेकीत आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. जखमींची संख्या 186 वर गेली आहे.

आमच्याकडे मनुष्यदल कमी -पोलीस आयुक्त

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प राजधानीत येत असताना आणि हायऍलर्ट जारी केल्यानंतरही दंगल कशी भडकली असा प्रश्न उपस्थितीत होत आहेत. दिल्ली पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेला तणावाचा अंदाज आला नाही का? असेही विचारले जात आहे. मात्र, यावर दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे असे केंद्रीय गृहमंत्रालयाला सांगितले आहे.

फ्लॅगमार्च बंदोबस्त वाढविला

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर-पूर्व दिल्लीत एक महिना जमावबंदी आदेश लागू केला. निमलष्करी दल, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 67 तुकडय़ा तैनात केल्या आहेत. हिंसाचारग्रस्त भागात फ्लॅगमार्च करण्यात आला.

उत्तरपूर्व दिल्ली लष्कराच्या हाती सोपवा -ओवेसी

उत्तरपूर्व दिल्लीतील परिस्थिती गंभीर बनली आहे. येथे शांतता प्रस्थापित व्हावे असे पंतप्रधान कार्यालयाला वाटत असेल तर उत्तरपूर्व दिल्ली लष्कराच्या हाती द्यायला पाहिजे अशी मागणी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. लोकांचे जीव वाचवायचे असतील तर हाच एकमेव उपाय असल्याचे ते म्हणाले. पोलीस जबाबदारीने वागत नाहीत. हिंसाचार भडकविणाऱयांबरोबर पोलीस दिसत आहेत, असा आरोपही ओवेसी यांनी केला आहे.

वरिष्ठांचे आदेश मिळत नसल्याने पोलिसांनी कारवाई केली नाही – केजरीवाल

हिंसाचार भडकला असताना घरे, दुकाने, गाडय़ा जळताना दिल्लीचे पोलीस काही करत नव्हते. लाठीमार करावा की अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या याचे आदेश वरिष्ठांकडून मिळत नसल्याने पोलिसांना दंगलखोरांवर कारवाई करता येत नव्हती, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारांना दिली. सर्वपक्षीय आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱयांच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा केजरीवाल यांनी घेतला. यावेळी केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेला शांततेचे आवाहन केले. पोलीस कॉन्स्टेबल रतनलाल, नागरिकांचा मृत्यू दुःखदायी आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आपल्या सरकारमधील मंत्र्यांसह राजघाट येथे महात्मा गांधीजींच्या समाधीला आदरांजली वाहून शांतता, सलोखा राहावा यासाठी प्रार्थना केली.

सर्वोच्च न्यायालय, हायकोर्टात आज सुनावणी

हिंसाचाराच्या गंभीर मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात उद्या (दि. 26) सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या आदेशाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

कपिल मिश्रा असो की कोणीही, कारवाई झालीच पाहिजे – गंभीर

भाजपचे कपिल मिश्रा असो की कोणत्याही पक्षाचा नेता असू द्या. हिंसाचार भडकविणाऱयांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी स्पष्ट मागणी नवी दिल्लीतील भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी केली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आढावा बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी दुपारी आणि रात्री उशिरापर्यंत बैठक घेऊन दिल्लीतील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नायब राज्यपाल अनिल बैजल, पोलीस आयुक्त अजय पटनायक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी माहिती दिली. बाहेरील लोक येथे येऊन वातावरण बिघडवीत आहेत. त्यामुळे दिल्लीच्या सीमा तत्काळ सील करून इतरांना प्रवेशबंदी करावी अशी मागणी केल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. तसेच हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्व मदत करेल. पोलीस कुमक कमी पडू देणार नाही असे आश्वासन गृहमंत्री शहा यांनी दिल्याचे केजरीवाल म्हणाले.

मुंबईत हाय ऍलर्ट

सीएए कायद्याचे विरोधक आणि समर्थक यांच्यामध्ये राजधानी दिल्लीमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय ऍलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेला दिल्लीतील हिंसाचारामुळे गालबोट लागू नये यासाठी पोलिसांना अत्यंत दक्ष राहण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत.

गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱयांनी ही माहिती दिली. दिल्लीतील हिंसाचारामध्ये आतापर्यंत एका पोलिसासह अनेकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील हिंसाचाराचे पडसाद मुंबईत उमटू नयेत म्हणून पोलिसांना खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. आझाद मैदान वगळता मुंबईत इतर ठिकाणी निदर्शने करण्याची परवानगी देऊ नये अशाही सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती या अधिकाऱयाने दिली.

मरीन ड्राइव्ह येथे आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा

मरीन ड्राइव्ह येथे परवानगी नसतानाही सीएए आणि एनआरसी विरोधात निदर्शने करणाऱया 30 ते 35 जणांविरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री 30 ते 35 जणांच्या ग्रुपने मरीन ड्राइव्ह येथे एकत्र जमून सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी घोषणाबाजी तसेच भाषण करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बेकायदेशीरपणे आंदोलन करणाऱया आंदोलकांना तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर विविध कलमांन्वये मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात 30 ते 35 आंदोलकांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पप्पा ड्रॉइंगरूममध्ये पाहुण्यांबरोबर बसलेत आणि इतर जण भांडताहेत

पप्पा ड्रॉइंगरूममध्ये पाहुण्यांबरोबर बसलेत आणि कुटुंबातील सदस्य इतर रूममध्ये जोरजोरात भांडत आहेत. हे खूप वाईट आहे, असे ट्विट करून प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी ट्रम्प यांचा पाहुणचार करणाऱया मोदींना टोला हाणला आहे. या ट्विटचा संदर्भ लक्षात येताच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मोदी यांना ‘पप्पा’ म्हणून ट्रोल केले.

गाड्यांच्या मार्केटची राखरांगोळी

उत्तर-पूर्व दिल्लीत चारचाकी आणि दुचाकी गाडय़ांचे मोठे मार्केट आहे. विशेषतः जुन्या गाडय़ांची विक्री मोठय़ा प्रमाणावर होते. तसेच येथे भले मोठे टायर मार्केट आहे. दंगेखोरांनी आग लावली. शेकडो दुकाने आणि हजारो गाडय़ांची राखरांगोळी झाली.

अनेक घरांनाही आगी लावल्या. अग्नीशमन दलाच्या गाडय़ा आडवून दगडफेक करण्यात आली. रस्त्यांवर सर्वत्र दगडधोंडय़ांचा खच पडला होता. अत्यंत भितीदायक वातावरण राजधानीत होते.

कपिल मिश्राची चिथावणी

गेले दोन महिने शाहीनबाग येथे सीएएविरोधात शांततेने आंदोलन सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नेमून आंदोलकांनी रस्ता मोकळा करावा आणि दुसरीकडे जाऊन आंदोलन करावे असे प्रयत्न सुरू होते. मात्र, रविवारी भाजपनेते कपिल मिश्रा यांचे भडकावू वक्तव्य आले आणि सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये भडका उडाला.

सीएए विरोधकांनी रस्ता मोकळा केला नाही तर आम्ही आम्ही सीएए समर्थक रस्त्यावर उतरू. दिल्ली पोलिसांनी तीन दिवसांत या आंदोलकांना हटवावे असे वक्तव्य मिश्रा यांनी रविवारी दुपारी केले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प येत आहेत, त्यामुळे आम्ही शांत आहोत. एकदा ट्रम्प देशातून गेले की बघून घेऊ अशी धमकीच मिश्रा यांनी दिली होती. त्यानंतर रविवारपासून उत्तरपूर्व भागात हिंसाचाराचा भडका उडाला असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, भाजपनेते मिश्रा यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या