दिल्ली हिंसाचारातील बळींची संख्या 38 वर; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

509

‘सीएए’विरोधात राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारातील बळींची संख्या 38, तर जखमींची संख्या 364 वर गेली आहे. शहरातील तीन रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या जखमींपैकी अकरा जणांचा गुरुवारी मृत्यू झाला. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, परिसरात मोठय़ा प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात असून तणाव कायम आहे.

बुधवारी रात्रीपर्यंत बळींची संख्या 27 होती. गुरुवारी आणखी 11 जणांचा मृत्यू झाला. मागील 36 तासांत परिस्थितीत सुधारणा झाल्याचा दावा गृह मंत्रालयाने रात्री केला. गृह मंत्री अमित शहा यांनी दंगलग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी चौकशीसाठी 514 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

अग्निशमन दलाकडे बुधवारी रात्री 19 कॉल्स

अधूनमधून जाळपोळीच्या घटना घडतच असून बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत अग्निशमन दलाला 19 कॉल्स आले. परिसरात 100 हून अधिक जवान तैनात असून चार फायर स्टेशन्सना अतिरिक्त बंब पुरवले आहेत अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी दिली.

आठवीतील मुलगी सोमवारपासून बेपत्ता

खाजुरी खास परिसरातील शाळेत परीक्षा देण्यासाठी गेलेली आठवीतील मुलगी सोमवारपासून बेपत्ता आहे. परीक्षेच्या दिवशी सायंकाळी वडील तिला आणण्यासाठी घरातून बाहेर पडले होते, मात्र हिंसाचारामुळे ते शाळेत पोहचले नव्हते. याचदरम्यान मुलगी बेपत्ता झाली. मुलीचे काय झाले असेल अशी चिंता तिच्या कुटुंबीयांना सतावत आहे.

सॉलिसिटर जनरल दिल्ली पोलिसांची बाजू मांडणार

हिंसाचारासंबंधी न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांच्या सुनावणीवेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर कौर आचार्य, ज्येष्ठ वकील अमित महाजन आणि रजत नायर हे दिल्ली पोलिसांची बाजू मांडणार आहेत. नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी या चौघांची नियुक्ती केली.
मृतांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत

हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 10 लाख रुपये, तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्यकी 2 लाखांची भरपाई दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. तसेच घर आणि दुकान जळले असेल तर संबंधित मालकांना प्रत्येकी 5 लाखांची भरपाई देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. खासगी रुग्णालयातील रुग्णांचा उपचार खर्चही सरकार उचलणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या