दिल्लीत परिस्थिती गंभीर, लष्कर बोलवा; मुख्यमंत्री केजरीवाल यांचे केंद्र सरकारला साकडे

454

नागरिकत्व सुधारित कायद्यावरून (सीएए) उसळलेल्या आगडोंबामुळे दिल्लीतील परिस्थिती फारच स्फोटक आणि गंभीर आहे. दिल्ली पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणली जाऊ शकत नाही. पोलिसांचे प्रयत्न कमी पडत आहेत. त्यामुळे तातडीने लष्कराला पाचारण करावे अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. याबाबत आपण गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

दिल्लीतील हिंसाचारात मंगळवारी मृतांची संख्या 13 होती. जखमींपैकी अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. अनेकांचे डोके फुटले आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना बुधवारी आणखी 10 जणांचा मृत्यू झाला. ‘आयबी’च्या एका अधिकाऱयाचा मृतदेह मिळाला. मृतांची संख्या 27 वर गेली आहे. दिल्ली पोलिसांनी 18 एफआयआर दाखल केले असून, 106 जणांना अटक केली आहे.

  • गुप्तचर यंत्रणा ‘आयबी’चे अधिकारी अनिल शर्मा (वय 26) यांचा मृतदेह दंगलग्रस्त उत्तर-पूर्व दिल्लीतील चांदबारा परिसरात आढळला आहे. सोमवारी पोलीस कॉन्स्टेबल रतनलाल यांचा दगडफेकीत मृत्यू झाला होता. आता ‘आयबी’च्या तरुण अधिकाऱयाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

उच्च न्यायालयात मध्यरात्री सुनावणी
प्रचंड हिंसाचाराची गंभीर दखल घेऊन दिल्ली उच्च न्यायालयाने मध्यरात्री 12.30 वाजता सुनावणी घेतली. न्यायमूर्ती एस. मुरलीधर आणि न्यायमूर्ती अनुप भामभानी यांच्या खंडपीठाने पोलीस आणि सरकारी यंत्रणेला जोरदार फटकारले.

हिंसाचाराला अमित शहाच जबाबदार!- सुप्रिया सुळे
मुंबई Š दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार असून त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हिंदुस्थानात असताना सुरक्षेत गंभीर त्रुटी राहिल्या. याला शहा हेच जबाबदार आहेत. याची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करते असे त्या म्हणाल्या.

अमित शहा कुठे गायब होते? गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या – सोनिया गांधी
दिल्लीतील हिंसाचारास केंद्र सरकार दिल्ली सरकार जबाबदार आहे. हिंसाचार भडकल्यानंतर 72 तासांत केंद्र सरकारने हिंसाचार रोखण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. दिल्लीतील दंगल ही पूर्वनियोजित होती. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज जोरदार हल्लाबोल केला. रविवारपासून अमित शहा कुठे गायब होते, काय करत होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज काँगेस कार्यसमितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी दंगलग्रस्त भागात शांती मार्च काढून दिल्लीकरांना शांततेचे आवाहन केले आहे.

अजित डोवाल यांच्याकडून पाहणी
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी उत्तर-पूर्व दिल्लीच्या हिंसाचारग्रस्त भागाची आज दिवसभरात दोन वेळा पाहणी केली. या भागास भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आहे असे त्यांनी सांगितले. डोवाल यांनी नागरिकांशीही संवाद साधला. जाफराबाद येथे एका तरुणीने हा परिसर सुरक्षित नाही. जेव्हा दंगेखोर नासधूस करीत होते तेव्हा पोलीस केवळ बघ्याच्या भुमिकेत होते. पोलिसांनी दंगलखोरांवर काही कारवाई केली नाही असे सांगितले. त्यावर डोवाल यांनी पोलिसांना सूचना दिल्या.

शांतता आणि बंधुभाव राखा – पंतप्रधान मोदी
शांतता आणि बंधुभाव ही आपली संस्कृती आहे. बंधु-भगिनींनो दिल्लीत शांतता ठेवा. आपसात बंधुभाव जोपासा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे केले आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस आणि इतर प्रमुख यंत्रणा प्रयत्न करीत आहेत. लवकर शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या