
नवी दिल्लीतील मदनगीर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. औषध कंपनीत काम करणाऱ्या एका २८ वर्षीय कर्मचाऱ्यावर त्याच्या पत्नीने उकळते तेल ओतले. आणि त्यानंतर तिने त्याच्यावर लाल तिखटही टाकले. यामुळे त्या तरूणाला गंभीर दुखापत झाली. ही संपूर्ण घटना 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश असे त्या पीडित तरुणाचे नाव असून तो एका औषध कंपनीत काम करतो. दिनेश, त्याची पत्नी आणि त्यांची 8 वर्षांची मुलगी असा त्यांचा परिवार आहे. 2 ऑक्टोबर रोजी काम संपवून उशिरा घरी परतला होता. त्यानंतर त्याने जेवण केले आणि मग झोपी गेला. यावेळी पहाटे 3 च्या सुमारास त्याला अचानक अंगावर जळजळ आणि वेदना जाणवल्या. त्यामुळे तो हडबडून जागा झाला. यावेळी त्याने जे दृष्य पाहिलं त्यामुळे तो घाबरून गेला होता.
दिनेशने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, तो जेव्हा झोपेतून उठला तेव्हा त्याची पत्नी त्याच्या अंगावर उकळत तेल ओतत होती. एवढ्यावरच ती थांबली नाही तर तिने वरून तिखट मसालाही टाकला. त्यामुळे त्याच्या शरिरावर अनेक दखमा झाल्या. स्वत: ला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होता. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्याला धमकी दिली की, जर जास्त आवाज केलास तर आणखी तेल ओतेन…. पण दिनेश मदतीसाठी आरडोओरडा करतच होता. त्यामुळे त्याचा आवाज एकून आजूबाजूवाले दिनेशच्या मदतीसाठी धावून आले.
जेव्हा शेजारी दिनेशच्या मदतीसाठी गेले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे ते दिनेशची मदत करू शकले नाही. दरम्यान काही वेळाच्या अथक प्रयत्नांनतर दिनेशला बाहेर काढले. यावेळी तो गंभीर भाजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्य़ाचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालू केला असून आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.