महाराष्ट्रासाठी स्वतंत्र लसीकरण ऍप द्या!

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारच्या कोविन अॅपमध्ये नोंदणी करण्यात प्रचंड अडचणी येत असल्याने लसीकरण मोहिमेला फटका बसत असून अनेकांना वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रासाठी स्वतंत्र लसीकरण अॅप द्यावे अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

केंद्र सरकारच्या कोविन लसीकरण अॅपमध्ये अनेक त्रुटी असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला लसीकरण नोंदणीसाठी वेगळा अॅप द्यावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. सध्याच्या अॅपमुळे लसीकरणाची नोंदणी करताना लसीकरणाचा स्लॉट तासनतास प्रयत्न करून मिळत नसल्याने सर्वसामान्य त्रस्त आहेत.

एका जिह्यातील नागरिकांना दुसऱया जिह्यात नोंदणी मिळत असल्याने स्थानिकांना लसीकरणात प्राधान्य मिळत नाही. याचा रोष स्थानिक लोकप्रतिनिधींना सहन करवा लागतो. तसेच लांबचे केंद्र मिळाल्याने प्रवासाची साधने उपलब्ध नसल्यास लस घेण्यासाठी नागरिक उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे लसींचा साठा परत पाठवावा लागल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे स्थानिक समस्यांवर केंद्र सरकारने दिलेले अॅप अव्यवहार्य नसल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारला लसीकरण नोंदणीसाठी वेगळा अॅप द्यावा, जेणेकरून  सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या राहत्या विभागाप्रमाणे लसीकरण करणे सुलभ जाईल व कमीतकमी वेळात जास्तीत लसीकरण करणे सहज शक्य होईल असे सुनील प्रभू यांनी म्हटले आहे. याबाबत प्रभू यांनी ट्विटरवर मागणी केली आहे.

प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो कायम ठेवू

कोविड लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा आम्ही हटवणार नाही. पण आम्हाला स्वतंत्र कोविड अॅप तयार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

कोविन अॅपवर नोंदणी केल्यावर लस दिली जात आहे. परंतु हे अॅप वारंवार डाऊन होत आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहेच, शिवाय लोकांना रजिस्टर्ड करायला अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारला हे अॅप तयार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या