लोकशाहीचे रुपांतर हळूहळू हुकूमशाहीत होतंय, भास्कर जाधव यांची सरकारवर टीका

लोकशाहीचे रुपांतर हळूहळू हुकूमशाहीत होतंय, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर केली आहे. निवडून आलेल्या उमेदवाराला विकत घेण्याची प्रथा सुरू झाली आहे, असंही ते म्हणाले आहेत. चिपळूणमध्ये जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यापूर्वी भास्कर जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

भास्कर जाधव म्हणाले आहेत की, “देशात सध्या निवडणूक ही लोकांच्या मर्जीनुसार, लोकांच्या पसंतीनुसार सुरू नाही, लोकांनी ठरवलेला उमेदवार हा उमेदवार नाही. आता उमेदवार कोणीही असू दे, लोकांनी कोणालाही मते देऊ दे, आता मतदान यंत्रामध्ये काही ना काही काळाबाजार केला जातो. त्याचबरोबर समोरच्या लोकांची मतदार यादीतून नावेच गायब करायची आणि बाहेरची जी आपल्याला हवी, ती नावे आतमध्ये घालून, खोटं मतदान करून आपले उमेदवार जिंकवायचे, हा दुसरा फंडा सुरू झाला आहे.”