वातावरण आणि अधूनमधून रिमझिम पाऊस कोसळत असल्याने सखल भागात पाणी साचते. यामुळे सध्या शहर आणि परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून, महिनाभरात डेंग्यूचे तब्बल 18 रुग्ण आढळले आहेत. यातील काहीजण बरे झाले असून, काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहरात गेल्या 10 दिवसांत 13 रुग्ण वाढले आहेत.
नगर शहरात दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. गेल्या महिनाभरात 18 रुग्ण आढळून आले. शहरात दैनंदिन स्वच्छतेकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने डेंग्यूचा फैलाव अधिक वाढल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. गेल्या दहा दिवसांत 13 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू आजाराचा फैलाव वाढला असला, तरी महापालिकेचा आरोग्य विभाग पूर्णपणे गाफील असल्याचे दिसून येत आहे. योग्य उपाययोजना होत नसल्याने नगरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
खासगी दवाखान्यात डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची गर्दी वाढत चालली आहे. महापालिकेकडून डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत डेंग्यू संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येतात.
घरात आजारी असलेल्या वा रुग्णालयात उपचार घेणाऱया रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन सर्वोपचार रुग्णालयातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतात. त्यातून संबंधित रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, याचा अहवाल प्राप्त होतो. रुग्ण राहत असलेल्या परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून फवारणी केली जाते.
पावसाळ्यातील साथीच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, नेहमीप्रमाणे साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, शहरात घरोघरी सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. वेळीच काळजी घेतली नाही तर व्हायरल इन्फेक्शनचे डेंग्यू, चिकुनगुनिया, टायफॉईड, गोचीड ताप या आजारांमध्ये रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असे तज्ञांचे मत आहे.
शहरात रुग्णांचे प्रमाण वाढले
मनपाच्या आरोग्य विभागाकडे सध्या डेंग्यू, चिकुनगुनिया, टायफॉईड, गोचीड ताप अशा रुग्णांची नोंद आहे. याव्यतिरिक्त सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. सरकारीसह खासगी रुग्णालयांमध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रुग्णांची मोठी गर्दी दिसत आहे. पावसाळ्यात वाढणारे साथीचे आजार लक्षात घेत मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना सुरू आहेत. शहरात औषध व धूर फवारणी सुरू आहे. शहरात नुकतेच कंटनेर सर्व्हे करून डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करण्यात आली आहेत.