
सामना ऑनलाईन,समारा
रशिया येथे सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपमधील ‘सी’ गटातील पहिल्या लढतीत पेरूला हरवणाऱ्या डेन्मार्कला गुरुवारी ऑस्ट्रेलियाने १-१ अशा बरोबरीत रोखले. ख्रिस्तियन इरिकनसनने सातव्या मिनिटाला गोल करीत डेन्मार्कला आघाडी मिळवून दिली. पण कर्णधार माईल जेडीनॅकने ३८व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करीत ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कपमध्ये अद्याप विजय मिळवता आलेला नाही.
पॉल्सन पुढच्या सामन्याला मुकणार
डेन्मार्कच्या युसूफ पॉल्सनला या लढतीत रेफ्रींकडून यलो कार्ड दाखवण्यात आले. याआधी पेरूविरुद्धच्या लढतीतही त्याला यलो कार्ड दाखवण्यात आले होते. याचा अर्थ मिळालेल्या दोन यलो कार्डमुळे आता येत्या २६ जूनला फ्रान्सविरुद्धच्या लढतीला तो मुकणार आहे.
… तेव्हा एकही सामना हरलेला नाही
ख्रिस्तियन इरिकसन याने गोल केल्यानंतर डेन्मार्कचा संघ एकही सामन्यात पराभूत झालेला नाही. याही लढतीत ती परंपरा कायम राहिली. डेन्मार्कसाठी त्याने गोल केला, मात्र डेन्मार्कला या लढतीत बरोबरीत समाधान मानावे लागले.




























































