
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालन आता कायमचे सुने सुने झाले आहे. अनेकदा सकाळी सात-आठ वाजल्यापासून अजित पवार सहाव्या मजल्यावरील दालनात येऊन बसत. तेव्हापासून सतत कार्यकर्त्यांचा गोतावळा त्यांच्या दालनाच्या बाहेर असायचा. आजच्या दुर्घटनेनंतर सहाव्या मजल्यावरील दालन आता कायमचे सुने सुने झाले, अशी भावना मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची ब्रेकिंग बातमी मंत्रालयातल्या पोलीस नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी टीव्हीवर पाहिली तेव्हा पोलिस कर्मचाऱ्यांचा प्रथम विश्वासच बसत नव्हता. मग पंट्रोल रूममध्ये सर्वत्र संपर्प साधण्यास सुरुवात झाली. डीजी ऑफिसमधून पंट्रोल रूमला मेसेज आला. विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याचे वृत्त समजले तेव्हा पोलिसांसह मंत्रालयातील कर्मचारी वर्गही हादरला. शासकीय कार्यालयांना सुटी जाहीर झाली, पण तरीही अनेक कर्मचाऱ्यांचा पाय मंत्रालयातून बाहेर निघत नव्हता. मंत्रालयाच्या इमारतीवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला. मंगळवारी झालेल्या पॅबिनेटला अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. कालची मंत्रिमंडळ बैठक त्यांची दुर्दैवाने शेवटची ठरली. कालही सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होती. मुख्यमंत्र्यांच्या दालनापेक्षा अजित पवार यांच्या दालनाबाहेर नेहमीच कार्यकर्त्यांची गर्दी झालेली दिसायची. कार्यकर्त्यांच्या गर्दीची काsंडी पह्डत जाताना अनेकदा शासकीय कर्मचाऱ्यांच्या कपाळावर आठय़ा उमटत, पण बोलण्याची हिंमत कोणत्याही कर्मचाऱ्यामध्ये नव्हती. अगदी कोविड काळातही अजित पवार नियमितपणे मंत्रालयातील दालनात येऊन बसत.
काय रे, मंत्रालयात कशाला येतोस?
मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते अजित पवार यांना भेटायला मंत्रालयात येत. प्रत्येक कार्यकर्त्याला अजित पवार आवर्जून भेटत होते. पण दुसरीकडे ‘काय रे , एवढय़ा लांबून मंत्रालयात कशाला येतोस? मतदारसंघात मी भेटत नाही का तुम्हाला?’ अशा प्रेमळ शब्दात दमही भरत होते. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून खाली उतरून गेटवरील मोटारीत बसेपर्यंत अजित पवारांच्या मागे कार्यकर्ते अक्षरशः धावत असत. कार्यकर्त्यांना आवरणे आम्हालाही कठीण जात होते, अशी आठवण सहाव्या मजल्यावर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी सांगितली. आता यापुढे सहाव्या मजल्यावरील ‘दादां’चे दालन आणि दालनाबाहेरचा व्हरांडा कायमचा ओस दिसेल, असे सांगताना शासकीय कर्मचाऱ्यांच्या डोळ्याच्या कडा नकळत पाणावल्या होत्या.































































