प्लास्टिक बंदीमुळे रद्दीला अच्छे दिन, रद्दीचा भाव वधारला

सामना प्रतिनिधी । नळदुर्ग

प्लास्टिक बंदीमुळे प्लास्टिकच्या कॅरीबॅग वापरण्यावर निर्बंध आल्याने गेल्या अनेक वर्षानंतर रद्दीला नळदुर्ग शहर व परिसरात चांगले दिवस आले आहेत. मागील चार दिवसांपूर्वी दहा रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या रद्दीचा भाव आज वीस रुपये किलो झाला आहे.

पर्यावरणास हानिकारक असल्यामुळे राज्य शासनाने राज्यात प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. याचा परिणाम म्हणून बाजारात सर्रासपणे वापरले जाणाऱ्या कॅरीबॅग वापरावर पूर्णपणे बंदी आली आहे. नळदुर्ग शहरात प्लास्टिक वापर बंदीची अतिशय कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात कॅरीबॅग वापरावर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. व्यापारी, दुकानदार तसेच मटन मार्केटमध्ये कॅरीबॅग ऐवजी कागदाचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर नागरिकही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी कापडी पिशवी किंवा डब्यांचा वापर करीत आहेत. काही वर्षांपूर्वी म्हणजे कॅरीबॅग वापरण्यास सुरुवात होण्यापूर्वी व्यापारी, दुकानदार ग्राहकांना कागदात पुड्या बांधूनच सामान देत होते. मात्र बाजारात कॅरीबॅग आल्यानंतर कागदाचा वापर कमी होण्याबरोबरच दुकानदारांचे पुड्या बांधणे ही जवळपास बंदच झाले होते. मात्र आता प्लास्टिक वापरावर बंदी आल्यामुळे कॅरीबॅग वापरणेही जवळपास बंद झाले आहे. त्यामुळे दुकानदारांना आता पूर्वीसारखेच ग्राहकांना कागदात पुडी बांधूनच साहित्य द्यावे लागणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षानंतर या प्लास्टिक बंदीमुळे रद्दीला चांगले दिवस आले आहेत. चार दिवसांपूर्वी दहा रुपये किलोने विकणारी रद्दी आज २० रुपये किलोने विकली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या