सरकार पाडण्याचे प्रयत्न करणार नाही – देवेंद्र फडणवीस

559
devendra-fadnavis

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षावर आरोप केले जात आहेत. मात्र हे आरोप चुकीचे आहेत. आघाडीतच अंतर्विरोध खुप आहे, त्यामुळे आम्ही राज्य सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही, असेही प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आज गुरुवारी संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर आयएमए सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, सक्षम विरोधी पक्ष या नात्याने आम्ही लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यभर फिरत आहोत, आमच्या फिरण्यावर आक्षेप घेतला जातो, आम्ही कोरोनाच्या प्रश्नावर राजकारण करत आहोत, असा आरोप केला जातो, तो साफ चुकीचा आहे, असे फडणवीस म्हणाले.

नगरसेवक फोडाफोडी प्रकरणावरून फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीवर टीका केली. `कोरोना संकटाच्या काळात सरकार राजकारणात दंग आहे. ह्या काळातही नगरसेवक फोडाफोडी सुरू आहे. ते असे का करतात कळत नाही. मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्य असते. मात्र इथे तिन्ही पक्षांचे पॉवर सेंटर तयार झाल्याने प्रशासन गोंधळात आहे.’अशी टीकाही त्यांनी केली.

परीक्षा आत्ताच घ्यावी
युजीसीने देशातील सर्व राज्यांतील परीक्षांसाठी गाईड लाईन दिल्या आहेत, महाराष्ट्राव्यक्तिरिक्त अन्य कोणत्याही राज्यांनी विरोध केलेला नाही, परीक्षा आत्ताच घ्यावी, असे फडणवीस म्हणाले.

`सामना’त माझी कधीच तारीफ केली जात नाही – फडणवीस
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक `सामना’मधून इतरांचे कौतुक केले जाते, पण माझी कधीच तारीफ केली जात नाही अशी खंत फडणवीस यांनी व्यक्त केली. `सामना’त शरद पवार आणि राज्यपालांच्या विरोधात तसेच बाजूने लिहिले जाते पण माझी कधीच प्रशंसा केली जात नाही असे सांगतानाच फडणवीस यांनी आपली तशी अपेक्षाही नाही असा सावध पवित्राही घेतला. `सामना’मध्ये भाजपवर झालेली टीका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे केलेले कौतुक यासंदर्भात फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. टीकेबद्दल बोलताना त्यांनी `त्यांना काय लिहायचं ते लिहू द्या. त्यांचं त्यांना लखलाभ असो’ अशी उद्विग्नताही व्यक्त केली. शिवसेनेचे मुखपत्र असते तर मानले असते, पण `सामना’ आता सरकार आणि तिन्ही पक्ष सांभाळत असल्याने आम्ही गंभीरतेने घेत नाही असेही ते म्हणाले. ‘सामना’त कोरोनावर अग्रलेख दिसत नाही, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या