देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त फक्त नावालाच! अंबादास दानवे यांचा घणाघात

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात पत्ते खोळण्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी ट्वीट करत मंत्री माणिकराव कोकाटेंबाबतचा विधीमंडळ चौकशीचा अहवाल आल्याची माहिती दिली आहे. रोहित पवारांनी ट्वीटमध्ये असाही दावा की, 18 ते 22 मिनिटे सभागृहात कोकाटेंनी रमी गेम मोबाईलवर खेळला. यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवेंनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायलाच हवा अशी प्रतिक्रिया दिली.

यबाबतची चौकशी झाली आहे, त्यात कोकाटे अर्धा तास रम्मी खेळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्री संवेदनशील पाहिजे, त्यांना माफ केल्यास सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होईल. अन्यथा सभागृहात पत्ते घेऊन खेळले पाहिजे, मोबाईलवर खेळायाची काय गरज..? असेही दानवे म्हणाले. याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज्याचे कारभारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त तशी नावालाच उरली आहे वाटते. घपले करून हॉटेल घ्या, विधिमंडळात रम्मी खेळा, बरळा, मारामारी करा, कोणाच्याही नाकावर बुक्का मारा.. काहीही करा! आता हे दोन शिस्तीचे लोक फक्त नाराजी.. तीव्र नाराजी.. अति तीव्र नाराजी व्यक्त करतानाच दिसतात, असे शब्दांत दानवे यांनी फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर घणाघात केला आहे.