मराठय़ांमध्ये फूट पाडण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे, असा जोरदार हल्ला मनोज जरांगे यांनी आज केला. फडणवीसांनी अंगावर येऊ नये, नाहीतर मराठा समाज शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच बऱ्या बोलाने आरक्षण द्या नाहीतर तुमच्याशी भांडावेच लागेल, असे जरांगे म्हणाले.
पुणे येथील शांतता फेरीनंतर मनोज जरांगे आज नगरला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांना मराठय़ांच्या अंगावर सोडले आहेत, पण काहीही झाले तरी फडणवीस यांना आरक्षणप्रश्नी मराठा समाजाला उत्तर द्यावेच लागेल, असे जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षण न मिळाल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत सर्व 288 जागा लढवणार आणि 113 आमदार पाडणार असे मनोज जरांगे यांनी यावेळी जाहीर केले. ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गांसाठी आहेत तिथे मराठा उमेदवार देणार आणि अन्य ठिकाणी सर्वजातीय उमेदवार देऊ असे ते म्हणाले. कोणते 113 आमदार पाडणार हे त्यांनी सांगितले नाही. मनोज जरांगे यांच्या जनजागृती शांतता रॅलीचा समारोप उद्या नाशिक येथे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच 29 ऑगस्टला मराठा समाजाची बैठक होणार आहे.
श्रीमंतांमध्ये बसणाऱ्याला आरक्षण कळणार नाही
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे ऐकून मराठा समाजाचे आंदोलन सुरू असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल्याचे यावेळी जरांगे यांना माध्यमांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर ते म्हणाले की, राज ठाकरेंना जे वैभव मिळाले आहे ते गोरगरीब मराठा समाजामुळे मिळाले आहे. रोज ऊठसूट श्रीमंत लोकांमध्ये बसणाऱ्याला आरक्षणाचा मुद्दा कळणार नाही. त्यामुळे त्यांना मराठा समाजाच्या, गोरगरीबांच्या आरक्षणाची तीव्रता माहीत नाही, अशी टीका जरांगे यांनी केली.