
‘महाराष्ट्र हा हिंदुस्थानातील विदेशी गुंतवणुकीचा ’गेट वे’ आहे. आमच्याकडे आता तिसरी मुंबई उभी राहते आहे. उत्तम मेन्यू कार्ड आमच्याकडे आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आम्ही यशस्वी होऊ,’ असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘दावोस’मध्ये केला.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वार्षिक बैठकीसाठी दावोसमध्ये पोहोचलेल्या फडणवीस यांनी आज महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींची माहिती दिली. ‘देशात येणारी गुंतवणूक व त्याबाबतचे करार करण्यात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. सुमारे 60 ते 65 करार प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्राला यश मिळाले आहे. यावर्षी देखील चांगला प्रतिसाद मिळेल. महाराष्ट्रातून आलेल्या उद्योजकांनी दावोसमधील फोरमचा पुरेपूर उपयोग करावा,’ असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.
‘मुंबईच्या आसपास 675 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रावर आम्ही आणखी एक नवी मुंबई वसवणार आहोत. तिथे आम्ही एज्यु सिटी, मेडी सिटी, स्पोर्टस् सिटी, इनोव्हेशन सिटी साकारण्यात येणार आहे. तिथे मोठी गुंतवणूक येईल आणि तिथे मोठ्या प्रमाणावर रोजगार देखील उपलब्ध होतील,’ असे फडणवीस म्हणाले.
टॅरिफचा गुंतवणुकीवर परिणाम होणार नाही!
‘मागील वर्षाचे किंवा मागील दोन तिमाहींचे आकडे पाहिल्यास थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. आमच्या सरकारची धोरणे यासाठी कारणीभूत ठरत आहेत. टॅरिफ हा एक वेगळा प्रश्न आहे. काही उद्योगांना त्याची अडचण आहे. त्यांनाही मदत करण्याची आमची भूमिका आहे. मात्र टॅरिफमुळे एकूण गुंतवणुकीवर परिणाम होईल असे नाही,’ असे फडणवीस यांनी सांगितले.
कोल्हापूरसाठी केलेले सामंजस्य करार गुगलवर शोधतोय – सतेज पाटील
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी सात सामंजस्य करार केल्याचे सांगितले होते. तेच सामंजस्य करार आता गुगलवर शोधतोय, असा टोला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला आहे. दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री कोल्हापूरसाठी काही आणतील, याबाबत शंका आहे, असेही सतेज पाटील म्हणाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या मुलाखतीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.


























































