Devgad News : वाडा भटवाडी येथे घरफोडी, 5 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

देवगड तालुक्यातील वाडा भटवाडी येथील वैशाली गोपीनाथ घाडी (65) यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून चार लाखाच्या रोकडसह सुमारे 1 लाख 55 हजारचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेत एकूण 5 लाख 55 हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. 16 मे ते 6 जून या कालावधी ही घटना घडली असल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली घाडी या 16 मे रोजी आपले घर बंद करून गोवा येथे गेल्या होत्या. त्या घराच्या बाहेर परिसराची देखभाल दीपक अंकुश जाधव हे पाहत होते. दीपक सुद्धा 29 मे रोजी कामानिमीत्त मुंबईला गेले होते. 6 जून रोजी सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास जेव्हा ते त्यांच्या घरी गेले तेव्हा घराच्या मागील दरवाजा फोडलेला दिसला.  त्यानंतर दिपक यांनी तात्काळ सदर घटनेची माहिती वैशाली घाडी यांना फोनवरून दिली. चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने चोरून नेल्याचे तपासात उघड झाले. याबाबात सविस्तर तक्रार गुरुवारी रात्री देवगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. एकूण 5 लाख 55 हजार रुपयांची चोरी झाल्याचे वैशाली घाडी यांनी फिर्यादित म्हटलं आहे. यामध्ये 40 हजार किमतीचे 3 तोळ्याचे मंगळसूत्र, 25 हजार रुपये किमतीचे 2 तोळ्याचे मंगळसूत्र, 25 हजार किमतीची 2 तोळ्याची पीळ अससलेली चैन, 15 हजार किमतीच्या 5 सोन्याच्या अंगठ्या 1 ग्रॅम सोन्याची पट्ट्तील नथ, 40 हजार किमतीचे चांदचे ब्रेसलेट व कंबर साखळी अशी पाव किलो चांदी, 4 लाखाची रोकड यामध्ये 500 रुपयांच्या 400 नोटा, 100 रुपयांच्या 1 हजार नोटा, 200 रुपयांच्या 500 नोटा होत्या. सर्व मिळून 1 लाख 55 हजार रुपये किमतीचे दागिने व 4 लाखांची रोकड असे एकूण 5 लाख 55 हजार रुपयांची चोरी अज्ञान व्यक्तीने केली आहे. अज्ञान चोरट्याविरुद्ध भा.द.वि कलम 380, 357 अन्वये देवगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे PSI सुधीर कदम करत आहेत.