देवनार कत्तलखान्याचा कायापालट होणार! फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्रीच्या सल्ल्यानुसार होणार काम

पालिकेच्या देवनार कत्तलखान्याचा कायापालट फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्रीच्या सल्ल्यानुसार करण्यात येणार आहे. यामध्ये दररोज होणाऱया कत्तलींचे प्रमाण, प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना, स्वच्छतेच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. इतर राज्यांत अत्याधुनिक पद्धतीने झालेल्या कामाच्या धर्तीवर हे काम केले जाणार आहे. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत.

1971 मध्ये पालिकेने देवनार कत्तलखाना सुरू केला आहे. यामुळे वाढत्या मांसाच्या मागणीची गरज पूर्ण होण्यास मोठी मदत होत आहे. सुमारे 64 एकर परिसरात कारखाना, पशुधन बाजार केंद्र आणि जनावरांना चरण्यासाठी जागा आहे. हा कत्तलखाना बांधून झाल्यानंतर सुमारे 50 वर्षांहून अधिक काळ झाल्यामुळे आता स्ट्रक्चरल ऑडिटनुसार पालिका आवश्यक कामे करणार आहे. काही ठिकाणी धोकादायक भाग झाल्याच्या पार्श्वभूमीवर केवळ दुरुस्ती न करता पूर्ण कत्तलखाना नव्याने बांधण्यात येणार आहे. हे बांधकाम अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येणार असून अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.