
रणरणत्या उन्हात कानिफनाथांचा जयघोष करत आज मढी येथील भाविकांनी कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. सोमवारी रात्री आठ वाजल्यापासूनच भाविकांनी गडाकडे जाण्यासाठी गर्दी केली होती. आज सायंकाळी सात वाजेपर्यंत भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्याकरिता येत होते, मात्र भाविकांच्या वाढत जाणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे भाविकांचे फार हाल झाले.
समाधीचे दर्शन घेण्यासाठी काही भाविक, भक्त स्वत:चे वाहन घेऊन आले होते. पूजा साहित्य हातात घेऊन उभ्या असलेल्या भाविकांची दुहेरी दर्शनबारी चालू असल्याने नाथांच्या समाधीचे दर्शन घेऊन भाविक लवकर बाहेर पडत होते. मंदिराकडे येण्यासाठी एकेरी वाहतूक ठेवण्यात आली होती, मात्र वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली नसल्याने वाहतूक कोंडी झाली.
दोन वर्षांच्या कालखंडानंतर रेवडीच्या बाजारात चांगली उलाढाल झाली, मात्र गाढवांच्या बाजारात काठेवाडी व गावरान मिळून फक्त 150 गाढवे आली होती. परराज्यात गाढवाला चांगल्या किमतीत मागणी असल्याने हा परिणाम झाला असल्याचे गाढवाचे व्यापारी इसाक गुलाब मदारी यांनी सांगितले. यावेळी अंगावरील सोने व पाकीट चोरी झाल्याचे पाच गुन्हे दाखल झाले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी यात्रेकडे न फिरकल्याने बंदोबस्तावर असलेले पोलीस जागा मिळेल तेथे बसून होते. त्यामुळे आणि वाहतूक कोंडी, वाढती गर्दी यामुळे पाकीटमारीच्या अनेक घटना घडल्या. अनेक भाविक नाथांचे दर्शन घेऊन मायंबा, वृद्धेश्वर व मोहटे येथे गेल्याने या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी जमा झाली होती, तर यात्रेत मोठ्या संख्येने भाविक आल्याने शीतपेये, नाथांचे फोटो विक्रेते, स्टेशनरी, कटलरी, रुद्राक्षाच्या माळा, खेळणी या विक्रेत्यांचा चांगला धंदा झाला, तर अनेक भाविक नाथांचे दर्शन घेऊन उद्या पैठण येथे होणाऱ्या षष्ठी यात्रेसाठी रवाना झाले.


























































