हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे श्रावणातील पहिल्या सोमवारी नागनाथ प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी दिसून आली. मंदिरासह औंढा परिसर ‘बम बम बोले’ च्या गजराने दुमदुमून गेला.
औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असल्यामुळे श्रावण महिन्यात हिंगोलीसह मराठवाडा- विदर्भ, राज्यासह दिल्ली, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात येथून भाविक दर्शनासाठी येत असतात. श्रावणातील आज पहिल्या सोमवारी रात्रीपासून भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.
बम बम भोले …! श्री नागनाथ महाराज की जय…! अशा जयघोषाने परिसर भक्तीमय झाला आहे. प्रभू नागनाथाच्या दर्शनासाठी अनेक भाविक अनवाणी पायाने मंदिरामध्ये दाखल झाले होते. देवस्थानचे विश्वस्त ॲड. शिवशंकर वाबळे ( उमरेकर ) व देवस्थानचे व्यवस्थापक सुरेद्र डफळ यांनी प्रभू नागनाथास दुग्धाभिषेक करून महापूजा केली.पद्माक्ष पाठक, तुळजादास भोपी, जीवन ऋषी, नारायण भोपी, आबागुरु बल्लाळ ,गौरव पुराणीक , कल्याण पुराणीक , सौरव पुराणीक यांनी महापूजेची आवर्तने म्हटली. देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, पोलीस निरीक्षक गणेश राहीरे, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ ,कृष्णा पाटील ,रामप्रसाद उदगीर, मिरा काळे, गणेश उदगिरे, नागेश माने, बबन सोनुने, दीपक रणखांबे आदींची उपस्थिती होती. महापूजेनंतर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. मध्यरात्रीपासून नागनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पंचक्रोशीतील दिंड्या- टाळ मृदंगाच्या गजरामध्ये नागनाथ मंदिरामध्ये श्री नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. नागनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी संस्थांतर्फे साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येत आहे. मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा नागनाथ पोलीस ठाण्यासह अतिरिक्त पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
औंढा नागनाथ येथे श्रावणातल्या पहिल्या सोमवारी नागनाथ प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.