धनगर आंदोलकांचा आरक्षणासाठी रास्तारोको, पैठणमार्गावर वाहनांच्या रांगा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजासोबतच आता धनगर समाजही रस्त्यावर उतरला आहे. धनगर समाजाला दिलेले आरक्षणाचे वचन सरकारने पाळले नाही, यामुळे संतप्त समाज आज रस्त्यावर उतरला. संभाजीनगरमध्ये पैठणरोडवर रास्तारोको करत आंदोलकांनी वाहतूक रोखून धरली.

केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार येण्याआधी धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावू असं वचन देणाऱ्यांनी चार वर्षात धनगर आरक्षणासाठी कोणतीही हालचाल केली नाही. यामुळे धनगर समाज संतप्त झाला असून त्यांनी आंदोलनांच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटेपासून संभाजीनगर येथील पैठण रोडवर धनगर समाजाचे आंदोलक पोहोचले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. रास्तोरोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प होती. शाळा, महाविद्यालयांच्या गाड्याही यामुळे खोळंबून राहिल्या होत्या. अखेर पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

दरम्यान, हे आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. तसेच आंदोलनाची सांगता ही राष्ट्रगीताने करण्यात आली.