कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्ती – धनंजय मुंडे

416

परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत असलेले 2019-20 आणि 2020-21 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी कोरोनामुळे परदेशातून किंवा देशातून ऑनलाईन शिक्षण घेत असतील तर त्यांना फेब्रुवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत शैक्षणिक फी व निर्वाह भत्ता मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. समाज कल्याण आयुक्त पुणे यांना याबाबत राज्य शासन स्तरावरून आदेश पारित करण्यात आला असून शैक्षणिक फी व निर्वाह भत्ता देण्याच्या हा निर्णयास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

या निर्णयानुसार 2019-20 व त्याआधीच्या वर्षामध्ये परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड होऊन परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत असलेले व सध्या शिक्षण सुरू असलेले विद्यार्थी सद्यस्थितीत परदेशात राहून ऑनलाईन शिक्षण घेत असतील त्यांना फेब्रुवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या सत्रासाठी अनुज्ञेय असलेली शैक्षणिक फी व निर्वाहभत्ता मंजूर करण्यात आला आहे. तसेच 2019 -20 मध्ये निवड झालेले परंतु सद्यस्थितीत परदेशात राहून किंवा मायदेशी परतून पहिल्या सत्रासाठी ऑनलाईन शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांना 2020 -21 च्या पहिल्या सहामाहिसाठी अनुज्ञेय असलेली शैक्षणिक फी मंजूर करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत जे विद्यार्थी देशात परत येण्यास इच्छुक असतील, त्यांना ते ज्या तारखेला परत येतील तोपर्यंतचा निर्वाहभत्ता व येण्या-जाण्याचे नियमानुसार विमान प्रवास भाडेही देण्यात येणार असल्याचे या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाच्या काळात परदेश शिष्यवृत्तीचे लाभार्थी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळून त्यांना पाठबळ देण्याचा आमचा प्रयत्न असून, सप्टेंबर 2020 नंतर संबंधित विद्यापीठाशी चर्चा करून पुढील शैक्षणिक फीसंबंधी निर्णय घेण्यात येईल असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या