
परळी शहरात सात दिवसांपासून संविधान संरक्षण समितीमार्फत सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए कायद्याविरोधात परळी शहर पोलीस ठाणे व संभाजीनगर पोलीस ठाण्यासमोरील प्रांगणात आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाला दिलेल्या भेटीबाबत धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केली आहे. यामध्ये ” एनआरसी,सीएए विरोधात देशभरात आंदोलन केले जात आहे. आमचा मराठवाडा ही संघर्षाची भूमी आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही विरोधात परळीतही आंदोलन छेडले आहे. संविधान संरक्षण समिती परळीच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलान केले जात आहे. या आंदोलकांची भेट घेतली.” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.



























































