अवघ्या 500 रुपयांत लग्न, भोपाळ येथील जोडप्याचा समाजासमोर आदर्श

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नसोहळा म्हटला की थाटमाट आलाच. आपली बचत संपवून किंवा कर्ज काढून लोक लग्न करतात. गेल्या वर्षीपासून कोरोना निर्बंधांमुळे कमी माणसांच्या उपस्थितीत साधेपणाने लग्नसोहळे पार पडत आहेत. अशाच एका आदर्श लग्न सोहळ्याची चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशातील जोडप्याने फक्त 500 रुपयांमध्ये लग्न केले आहे. अधिकारी पदावर असलेल्या या महिलेवर आणि तिच्या पतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिवांगी जोशी, धार शहर दंडाधिकारी यांचा विवाह लडाख येथे तैनात असलेले मेजर अनिकेत चतुर्वेदी यांच्याशी नुकताच झाला. खरंतर त्यांचे लग्न दोन वर्षांपूर्वीच ठरले होते. मात्र शिवांगी या कोविड योद्धा म्हणून सेवा देत असल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता या जोडप्याने कोर्टात लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी कोर्टात 500 रुपये भरले. लग्नासाठी केवळ पुष्पहार आणि मिठाईची खरेदी केली. लग्नाला कुटुंबातील निवडक सदस्य हजर होते. तसेच जिल्हाधिकारी आलोक कुमार सिंह, एडीएम सलोनी सिडाना आणि कर्मचारी उपस्थित होते. शिवांगी यांनी सांगितले, आम्हाला पैशांची उधळपट्टी करायची नव्हती. त्यामुळे अशा पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळात गर्दी होऊ नये हाच आमचा उद्देश होता. सध्या हे लग्न चर्चेचा विषय ठरला आहे.