धाराशिवमध्ये गॅस वितरकाकडून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न, पोलीस तपासात निघाला भलताच ट्विस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात एका गॅस वितरकाने एचपी कंपनीच्या लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासात पुढे आलेल्या माहितीनंतर मोठा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काटी सावरगाव येथील गॅस वितरक ज्ञानेश्वर माळी यांनी एचपी कंपनीच्या आढावा बैठकीदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांकडून होत असलेल्या दबावामुळे ते मानसिक तणावाखाली होते.

दरम्यान, आखाती देशांमधील संघर्षामुळे देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असून, धाराशिव जिल्ह्यात त्याचा विशेष परिणाम जाणवत आहे. कमी पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे वितरकांवर प्रचंड ताण निर्माण झाला असून, याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, पोलिस तपासादरम्यान या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. तामलवाडी पोलिसांनी गॅस कंपनीशी संपर्क साधून साठ्याची तपासणी केली असता, मिळालेल्या आणि वितरित केलेल्या सिलिंडरच्या संख्येत मोठा फरक आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे 1200 गॅस सिलिंडरचा, अंदाजे 8 लाख रुपयांच्या किमतीचा गैरव्यवहार समोर आला असून, हे सिलिंडर काळ्या बाजारात विकले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाचा तपास तामलवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आत्महत्येचा प्रयत्न आणि कथित घोटाळा या दोन्ही बाबींमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.