
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी मंदिरावरील शिखर पुनर्बांधणी संदर्भात मुंबई येथे लवकरच महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अंतिम अहवालानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी दिली.
श्री तुळजा भवानी मंदिरात सुमारे 68 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी नव्याने केलेली बांधकामे काढून मंदिर मूळ स्वरूपात आणले जात आहे. पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीत ही सर्व कामे करण्यात येत आहेत. यामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यातील ग्रेनाईट काढण्यात आले आहेत. हे ग्रेनाईट काढल्यानंतर तुळजा भवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्याच्या काही प्राचीन शिळांना तडे गेल्याची बाब पुरातत्त्व विभागाचे अधिकारी व तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या संयुक्त पाहणीत उघड झाली होती.
केंद्रीय पुरातत्त्व विभागाने आतापर्यंत दोनदा पाहणी करून स्वतंत्र अहवाल सादर केले असून यात तात्पुरती डागडुजी करून संरचना सुरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र मंदिर संस्थान या उपाययोजनांवर समाधानी नसून कायमस्वरूपी उपायाची मागणी करत आहे. यासंदर्भात तिसरा आणि अंतिम अहवाल आल्यानंतरच शिखर उतरवण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या मंदिर गाभाऱ्यामध्ये लोखंडी साहित्याचा वापर करून शिळांना आधार देण्यात आला आहे.
लवकरच मुंबईत उच्चस्तरीय बैठक
श्री तुळजा भवानी मंदिरातील शिखर उतरविण्यासंदर्भात लवकरच मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या गाभाऱ्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नियंत्रण ठेवण्यात आले असून भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच वाट पाहावी, असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे.
शिखर उतरविण्यास भाविकांसह पुजाऱ्यांचा विरोध
श्री तुळजा भवानी माता ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असून पुरातन व जागृत देवस्थान आहे. सध्या करण्यात येत असलेल्या कामामध्ये काही दिवसांपूर्वीदेखील शिखर उतरविण्याबाबत चर्चा झाली असता नागरिक तसेच पुजाऱ्यांनीदेखील या निर्णयास मोठा विरोध केला होता. आता पुन्हा मंदिराच्या शिखराबाबत होणाऱ्या निर्णयामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हा निर्णय भावनिक असल्याने अत्यंत संवेदनशीलपणे घेण्यात येणार आहे.